कऱ्हाडातील पाणीपुरवठा होणार बंदिस्त पाईपलाईनने

सचिन शिंदे 
सोमवार, 7 मे 2018

शासकीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकातून त्यांना ठोस उपाय योजना हाती लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाकुर्डेच्या पाण्यासाठी बंदिस्त पाईप लाईन टाकण्यासाठी शासनाने घेतलेला पुढाकर म्हणावा लागेल.

कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणमधील गावांना वारणा विभागातर्फे वाकुर्डे पाणी योजनेतून पुरवठा होणारे पाणी बंदिस्त पाईप लाईनमधून करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचा आराखडा व त्यासोबतच्या ठिबक सिंचनासाठी आवश्यक तो दाब निर्माण होण्यासाठी विभागातील टोपोग्राफीचा म्हणजेच उंच सखल प्रदेशाचा शास्त्रीय अभ्यास करण्यास शासनाने प्रारंभ केला आहे. त्यानुसार बंदिस्त पाईपलाईनसह त्या अभ्यासाचा प्रस्ताव दोन महिन्यात शासनास सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच वाकुर्डे येथे होणारा पाणीपुरवठा बंदिस्त पाईपलाईनने होणार आहे.

कऱ्हाड दक्षिणेतील पाणी प्रश्नावर श्रमिक मुक्ती दलाने लक्ष घातले आहे. त्यानुसार शासकीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकातून त्यांना ठोस उपाययोजना हाती लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाकुर्डेच्या पाण्यासाठी बंदिस्त पाईप लाईन टाकण्यासाठी शासनाने घेतलेला पुढाकर म्हणावा लागेल. श्रमिक मुक्ती दल व ओंड, मनव, नांदगाव, उंडाळे, पवारवाडी भागातील पाणी संघर्ष समितीने वाकुर्डे प्रकल्पाबबात धोरणात्मक निर्णयासाठी शासानाकेड पाठपुरावा केला आहे. त्यानुसार बंदिस्त पाईपलाईनचा आराखडा करण्यास तत्वतः मंजूरी मिळाली आहे. अंतिम आराखडा भागाचा अभ्यास करून व दक्षिणेतील उंच सखल प्रदेशाचा अभ्यास करून करण्यात येणार आहे. त्याबाबत वारणा बांधकाम विभागातर्फे पहाणी सुरू आहे. पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांची डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यावर शिक्का मोर्तबही झाले आहे. त्यात डॉ. पाटणकर यांनी योजना दक्षिण कऱ्हाडसाठी महत्वाची आहे, असे पटवून दिले आहे. त्यानुसार शासनाने लवकरात लवकर अहवाल सादर करण्याविषयी आश्वासन दिले आहे. वाकुर्डे उपसा प्रकल्पामुळे विभागातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पाणी वापर संस्थांची भूमिका महत्वाची आहे. वातावरणातील बदल लहरी पावसामुळे भविष्यात उसाखालील क्षेत्र पूर्णतः ठिबक सिंचन पद्धतीवर नेऊन उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करावा लागेल. बंदिस्त पाईपलाईने पाणी पुरवठा व ठिबक सिंचनासाठी यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर नवीन धोरणानुसार शेतीसाठी मोजुन पाणी दिले जाणार आहे. सध्याच्या पाणी वितरण प्रणातील दोष आपोआप दूर होण्यास मदत होणार आहे. 

श्रमिकसह पाणी संघर्ष समितीचे योगदान वाकुर्डेच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी श्रमिक मुक्ती दलाने विशेष प्रयत्न केले. मात्र त्यासोबत तेथील स्थानिक पाणी संघर्ष समितीचा पाठपुरावाही महत्वाचा ठरला. त्यात सुनिल दत्त शिंदे यांच्यासह ओंड येथील व्ही. व्ही. थोरात, भाऊसाहेब थोरात, आनंदा थोरात, राजेंद्र थोरात, राहूल थोरात, अभिजीत थोरात, नांदगावचे गणेश पाटील, अधिकराव पाटील, विजय पाटील दिपक गुरव, प्रमोद जोशी, दिलीप पाटील, दिलीप दाजी, सचिन पाटील, भरत पाटील. मनवचे श्री. डांगे, तानाजी पोळ, हरिदास शेवाळे, अमोल येळमोर, भगवान जाधव, संतोष शिंदे, उंडाळे-साळशिरंबे येथील उदय पाटील, संजय पाटील, निवास पाटील, प्रमोद पाटील, जयसिंग पाटील, तानाजी माने, अंकुश पाटील, अजित गावडे यांचे योगदान महत्वाचे आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Karhad Water Pipelines