"कर्जतला जायचंय?' "...नको रे बाबा !' 

दत्ता उर्किडे 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

ठेकेदाराने रस्त्याच्या एका बाजूचे खडीकरण केल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवलाय, तर दुसरी बाजू खोदल्याने त्यातूनच वाहनांना कसरत करीत वाट काढावी लागते.

राशीन : "कर्जतला जायचंय?' "...नको रे बाबा !' अशी अंगावर काटा आणण्यासारखीच परिस्थिती राशीन-कर्जत रस्त्याची झाली आहे. वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीच्या लोटात माणसे माखून निघतात. खड्ड्यांनी पाठीच्या मणक्‍याची अक्षरश: "वाट' लागते. परिणामी, कितीही महत्त्वाचे काम असले, तरी प्रवासी पुन्हा धजावत नाहीत. 

या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या एका बाजूचे खडीकरण केल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवलाय, तर दुसरी बाजू खोदल्याने त्यातूनच वाहनांना कसरत करीत वाट काढावी लागते. सोळा किलोमीटरच्या या रस्त्यात निम्म्यापेक्षा जास्त ठिकाणी काम सुरू आहे. अन्य ठिकाणी स्वागताला खड्डे आहेतच. 

आवश्‍य वाचा नगर-दौंड रस्ता जिवावर उठला 

शिक्षणाचे माहेरघर असल्याने राशीनसह परिसरातून, नर्सरीपासून उच्च शिक्षणासाठी हजारो विद्यार्थ्यांची कर्जतला रोज ये-जा आहे. न्यायालयीन, महसुली कामासाठी आणि उपजिल्हा रुग्णालयात जाणाऱ्यांचीही मोठी परवड होते. एकदाचे या रस्त्याचे काम कधी पूर्ण होतेय आणि खड्डे आणि धुळीतून कधी सुटका होते, असे प्रत्येकाला वाटू लागले आहे. 

प्रवास करणे नकोसे झाले 
या रस्त्याच्या कामावर कोणाचा अंकुश आहे की नाही? संबंधित अधिकारी व ठेकेदार लोकांच्या संयमाची परीक्षा पाहत आहेत काय? या रस्त्याने प्रवास करणे नकोसे झाले आहे. 
- मनोज सागडे, राशीन 

क्‍लिक करा बिताका गडावर आढळली शिवकालीन तोफ 

कर्जत रस्त्याची दुरवस्थेमुळे लोक त्रस्त झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेला काम करताना त्रास होणार नाही अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत. याबाबत तातडीने उपाययोजना न राबविल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. 
- सुभाष जाधव, शिवसेना तालुका उपप्रमुख 

महिन्यात काम पूर्ण होईल 
आठ ते दहा दिवसांत आधुनिक पद्धतीने या रस्त्यावर डांबरीकरणाचा एक स्तर पूर्ण होईल. दुसऱ्या बाजूचे काम महिन्यात पूर्ण केले जाईल. 
- अशोक भोसले, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karjat Road bad