कर्मवीरांमुळे ज्ञान आणि श्रमातील दरी कमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यामुळे समाजातील ज्ञान आणि श्रम यातील दरी कमी होऊन नवमहाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यांच्या त्यागी तत्त्वज्ञानामुळे रयतच्या मुशीत तयार झालेली माणसे मिळालेले पद भोगाचे नसून त्यागाचे, सेवेचे आहे असे मानून कार्यरत राहतात, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केले.

सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यामुळे समाजातील ज्ञान आणि श्रम यातील दरी कमी होऊन नवमहाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यांच्या त्यागी तत्त्वज्ञानामुळे रयतच्या मुशीत तयार झालेली माणसे मिळालेले पद भोगाचे नसून त्यागाचे, सेवेचे आहे असे मानून कार्यरत राहतात, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने मानद सचिव इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सभागृहात कोल्हापूर येथील उद्योजक आणि संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य एम. के. बाढ यांना "इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, सहसचिव डॉ. डी. डी. पाटील, उत्तमराव आवारी, प्राचार्य शहाजी डोंगरे, डॉ. के. जी. कानडे आणि मान्यवर उपस्थित होते.
कर्मवीरांनी प्रतिकुल, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत केलेले शैक्षणिक कार्य आणि इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या कार्याचा आढावा घेताना डॉ. पाटील म्हणाले, ""रयत शिक्षण संस्थेची उभारणी करताना कर्मवीरांनी एक एक रत्न जमविले होते. इस्माईलसाहेब हे त्यातील मेरुमणी आहेत. त्यांनी आपल्या नि:स्वार्थी कार्याने केवळ रयत संस्थेतच नव्हे, तर समाजात एक आदर्श निर्माण केला. कर्मवीरांच्या तालमीत तयार झालेल्या या नि:स्वार्थी माणसाने मिळालेले सचिवपद कधीच भोगाचे समजले नाही. त्यांचे कार्य हे मानदंड आहे. त्यामुळेच संस्थेने त्यांचे नाव कॉलेजला देऊन जीवन गौरव पुरस्काराच्या रूपाने यथोचित स्मारक केले आहे.''
डॉ. अनिल पाटील म्हणाले, ""संस्थेच्या वाटचालीत मुल्लासाहेबांचे योगदान मोठे आहे. 54 वर्षे त्यांनी संस्थेची नि:स्वार्थी सेवा केली. कर्मवीरांच्या नंतर संस्थेची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.'' संस्थेने पुरस्कार दिल्याबद्दल श्री. बाढ यांनी आभार मानले. प्रारंभी मुल्ला यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या "समिधा' या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. ऍड. दिलावर मुल्ला यांनी पुरस्कारामागचा उद्देश सांगितला. प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी संस्थेच्या कार्याची व प्रगतीची माहिती दिली. प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: karmveer patil reduced difference between knowledge and work