
सीमाप्रश्नी वस्त्रोद्योगमंत्री श्रीमंत पाटील यांचीही जीभ घसरली
निपाणी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगाव महाराष्ट्रात घेण्याची तयारी चालविण्याचे बोलत आहेत. असे असेल तर मुंबई प्रांत पूर्वी कर्नाटकात होता. त्यानुसार महाराष्ट्राने बेळगाव घेऊन मुंबई कर्नाटकाला द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली. याशिवाय सीमाभागातील म. ए. समितीचा चॅप्टर लवकरच क्लोज करणार असल्याची दर्पोक्ती त्यांनी केली. बोरगाव येथील बस स्थानकाचे उद्घाटन केल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बुधवारी (ता. 27) ही मुक्ताफळे उधळली.
ते पुढे म्हणाले, ""मुंबई हा प्रांत पूर्वी कर्नाटकात होता. भाषावार प्रांतरचना झाल्यावर तो महाराष्ट्रात गेला, तर बेळगाव कर्नाटकाला दिले गेले. ही बाब सर्वोच्च न्यायालयात असताना बेळगाव, निपाणी परिसरातील मराठी भाषिक व म. ए. समितीचे कार्यकर्ते बंद, हरताळ करून हा भाग महाराष्ट्रात देण्याची मागणी करत आहेत; पण अद्याप न्यायालयाचा निकाल लागलेला नाही. मराठी भाषिकांच्या मागणीनुसार मुंबई भागातील कन्नड नागरिकांवरही आपला हक्क आहे. त्यामुळे वारंवार बेळगाव, निपाणीची मागणी करू नये.''
मंत्री सवदी म्हणाले, ""बेळगाव येथील म. ए. समितीच्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांना भाजपमध्ये ओढून सीमाप्रश्न संपविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया करून म. ए. समिती पूर्णपणे मोडीत काढणार आहोत. आता त्यासाठी जादा वेळ लागणार नाही. वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या असल्याचा दावा त्यांनी केला.''
हे पण वाचा - बाप रे! पहिला विवाह झाला असतानाही संपत्तीसाठी बनली चक्क मृत व्यक्तीची पत्नी
अरविंद पाटील भाजपचे उमेदवार असणार
खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी बेळगाव येथील जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपला मदत केल्याबद्दल पत्रकारांनी उपमुख्यमंत्री सवदी यांना छेडले असता लवकरच अरविंद पाटील हे विधानसभेसाठी भाजपचे उमेदवार म्हणून राहणार असल्याचे सांगितले.
हे पण वाचा - कोल्हापूचे दूध पोहोचले थेट गुजरातला
मंत्री श्रीमंत पाटील यांचीही जीभ घसरली
सीमाप्रश्नी वस्त्रोद्योगमंत्री श्रीमंत पाटील यांचीही जीभ घसरली. सर्वोच्च न्यायालयात दावा सुरू असला तरी सीमाप्रश्न हा संपलेला अध्याय, असा जावई शोध लावताना त्यांनी चक्क महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याचे वक्तव्य केले आहे. भाषिकवाद महाराष्ट्र सरकार उकरून काढत आहे. राजकीय हेतूने सीमाप्रश्नावर भाष्य केले जात आहे. सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने अस्तित्व गमाविले आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सीमाप्रश्नाचा विषय उपस्थित करून तेढ वाढवत असल्याचा आरोप करून या स्वरूपाची टीका किंवा वाद उकरून काढल्यास कर्नाटक शांत राहू शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येईल, असे विधान पाटील यांनी केले आहे.
संपादन - धनाजी सुर्वे