कर्नाटक विजयाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भाजपचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

सांगली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर सांगली शहरासह उपनगरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्‍यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर करत पेढे व साखर वाटप केली. जल्लोषामध्ये अनेक इच्छुक उमेदवार सहभागी झाल्याचे चित्र आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर दिसले.

सांगली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर सांगली शहरासह उपनगरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्‍यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर करत पेढे व साखर वाटप केली. जल्लोषामध्ये अनेक इच्छुक उमेदवार सहभागी झाल्याचे चित्र आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर दिसले.

आज सकाळपासून सांगलीमध्ये कर्नाटकच्या निकालाबाबत उत्सुकता होती. जिल्ह्यातील भाजप आणि कॉंग्रेसच्या नेतेमंडळींनी कर्नाटक सीमाभागातील प्रचारात मोठा सहभाग घेतला होता. तसेच व्यापाराच्या निमित्ताने सांगलीची कर्नाटकशी "कनेक्‍शन' असल्यामुळे व्यापारी वर्गासह सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले होते. सकाळी दहापासून कोणाची आघाडी कोण पिछाडीवर असे चित्र वृत्तवाहिन्यांवर दाखवले जात होते. जसजसे भाजप आघाडीवर असल्याची माहिती मिळाली तशी भाजप कार्यालयासमोर गर्दी वाढली. 

सकाळी अकराच्या सुमारास भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली. राममंदिर चौकात फटाके वाजवून विजयोत्सव साजरा केल्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग चौकातील कार्यालयासमोर गर्दी जमली. गर्दीमध्ये महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले चेहरे झळकत होते. ढोलताशाचा गजर करत फटाक्‍यांची आतषबाजी केली. पेढे व साखर वाटप केली. 

विश्रामबाग, संजयनगर, कुपवाड, शंभरफुटी रस्ता, गव्हर्मेंट कॉलनी आदी परिसरात जल्लोष करून आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर सर्वजण जमले. "भारतीय जनता पार्टीचा विजय असो' अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. 

आमदार गाडगीळ, माजी उपमहापौर शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर, भारती दिगडे, मुन्ना कुरणे, शेखर इनामदार, केदार खाडीलकर, श्रीकांत शिंदे, सुब्राव मद्रासी, दरीबा बंडगर, सुजीत काटे, अमोल कणसे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते.

Web Title: Karnataka Election Victory BJP Workers Celebrations