‘गोकुळ’ मल्टिस्टेटला कर्नाटकचा नकार

‘गोकुळ’ मल्टिस्टेटला कर्नाटकचा नकार

कोल्हापूर - जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यासाठी आवश्‍यक असलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यास कर्नाटक सरकारने नकार दिल्याने आमच्या ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याविरोधातील लढाईला यश आल्याचा दावा आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

कर्नाटक सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारही मल्टिस्टेटच्या ठरावाला विरोध करेल, तेही ना हरकत प्रमाणपत्र देणार नाही, असा विश्‍वास आमदार पाटील यांनी या वेळी व्यक्‍त केला.

आमदार पाटील म्हणाले, की ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याविरोधात सार्वत्रिक लढा सुरू आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे आम्ही हा विषय लावून धरला आहे. बऱ्याचदा निवेदने दिली आहेत. निवेदनांचा विचार करून कर्नाटक सरकारच्या सहकार विभागाचे निबंधक डॉ. एन. मंजुळा यांनी केंद्र सरकारच्या कृषी व सहकार विभागाच्या अतिरिक्‍त आयुक्‍तांना ‘ना हरकत’ नाकारत असल्याबाबतचे पत्र २१ मार्चला पाठविले आहे.

त्या पत्रात म्हटले आहे, की बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा कर्नाटक सहकार कायदा १९५९ नुसार नोंद झाला आहे. त्याचे कार्यक्षेत्र बेळगाव जिल्ह्यातील संपूर्ण तालुके आहेत. बेळगाव जिल्ह्यातील ७६५ सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था या बेळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अधिपत्याखाली येतात. कर्नाटक सरकारकडून या ठिकाणी जास्तीत जास्त दूध उत्पादक संस्था स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

कर्नाटक सहकारी दूध उत्पादक फेडरेशन आणि बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांनी बेळगाव जिल्ह्यातील अथणी, चिक्‍कोडी, हुक्‍केरी तालुक्‍यातील दूध संस्था या ‘गोकुळ’ला जोडण्यास व ‘गोकुळ’चे कार्यक्षेत्र कर्नाटकात वाढविण्यास विरोध दर्शविला असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच, याबाबतचे पत्र कर्नाटकच्या सहकार खात्याने केंद्र सरकारच्या कृषी व सहकार खात्यास कळविले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेस सदाशिव चरापले, शशिकांत खोत, बाळासाहेब कुपेकर, विजयसिंह मोरे, बाबासाहेब देवकर, अंजना रेडेकर, मधुआप्पा देसाई, शंकर बारगीर, बाबासाहेब चौगले, राऊ पाटील, मोहन सालपे, विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

आमचा लढा दूध उत्पादकांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. एक व्यापारी माणूस येऊन हा दूध संघ बळकावण्याचा प्रयत्न करीत होता. त्याविरुद्ध जिल्ह्यातील तमाम लोकांनी लढा दिला आहे. लढ्याला आज यश आले. कर्नाटक सरकारच्या निर्णयाने लोक आजपासून शांत झोपतील. तसेच, हा निर्णय मान्य करून ‘गोकुळ’ व्यवस्थापनाने मल्टिस्टेटचा ठराव रद्द करावा. असे केल्यास त्यांचा न्यायालयीन लढाईचा व संचालक- अधिकाऱ्यांच्या विमानाने दिल्लीवारीचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे हे पैसे वाचत असल्याने पशुखाद्य दरवाढ मागे घ्यावी.
- सतेज पाटील,
आमदार

‘कर्नाटकातील दूध कोणाच्या नावे घेता, ते जाहीर करा’
कर्नाटकमधून रोज दीड ते दोन लाख लिटर दुधाची खरेदी करण्यात येते. हे दूध कोणत्या दूध संस्थांतून येते आणि कोणाच्या नावे बिलिंग केले जाते, याची माहिती एकदा ‘गोकुळ’च्या अध्यक्ष आणि संचालक मंडळाने जाहीर करावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. तसेच, हैदराबाद येथून दहा टॅंकर दूध रोज आणण्याचे नियोजन आहे. हे टॅंकर कोणाचे घ्यायचे, यासाठी वाद सुरू असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी या वेळी केला.

गोकुळ मल्टिस्टेट होण्यासाठी कर्नाटक सरकारने नकार दिला. महाराष्ट्रातही हा डाव हाणून पाडणार. केंद्रातही त्याला मंजुरी मिळवून दिली जाणार नाही, यासाठी लढा उभारला जाणार आहे. प्रा. संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह आपण स्वतः ‘गोकुळ’ने घेतलेल्या बेकायदा सभेचा वृत्तांत सरकारपर्यंत पोचविला आहे. त्यामुळे महाराष्ट्रतही त्याला मंजुरी मिळणार नाही.
- चंद्रदीप नरके,
आमदार

पशुखाद्य दरवाढ मागे घ्या
‘गोकुळ’ने पशुखाद्य दरात वाढ केली आहे. जर ही दरवाढ मागे घेतली नाही, तर दूध संघावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार पाटील यांनी या वेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com