
महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे, कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. याआधी महाराष्ट्राने कर्नाटकला विकत पाणीपुरवठा केला होता.
Koyna Dam : कोयनेत फक्त 18 TMC पाणी; कर्नाटकला देणार तरी किती, शिंदे सरकार होणार मेहरबान?
सांगली : कोयना धरणात (Koyna Dam) १८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. एरवी हा साठा पुरेसा मानला जातो, मात्र यावर्षी अवर्षणाची स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. जुलैअखेरपर्यंत पाणी योजना चालवाव्या लागल्या तरी चालवा, असे शासनाचे आदेश आहेत.
त्यातच आता कर्नाटक सरकारने (Karnataka Government) सहा टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. या काळात एवढे पाणी देणे जवळपास अशक्य आहे. राज्य सरकार या स्थितीत काय मार्ग काढते, याकडे लक्ष असेल.
कर्नाटक राज्य शासनाकडून दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याची मागणी नोंदवली जाते. हिप्परगी धरणातील पाणीसाठा तळाला गेला की हिप्परगीपर्यंतच्या उत्तर कर्नाटक भागात पाणीटंचाई जाणवू लागते. कोयनेतून दरवर्षी दोन ते तीन टीएमसी पाणी कर्नाटकला सोडले जाते. काही वर्षे आधीपर्यंत हे पाणी विकत दिले जात होते.

मध्यंतरी जत तालुक्याला कर्नाटकातून पाणी आणण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर कोयनेतून पाण्याच्या बदल्यात कर्नाटकने सीमावर्ती जत भागाला त्यांच्या योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी पुढे आली. त्यावर बराच खल झाला आणि आजही सुरू आहे. यावर्षी पुन्हा एकदा कर्नाटकने पाण्याची मागणी केली आहे. यावेळी ती सहा टीएमसी इतकी केली आहे. कोयना धरणात १८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
टेंभू आणि ताकारी योजनांचे आवर्तन सुरू आहे. त्यासाठी सुमारे पाच ते सहा टीएमसी पाणी लागेल, शिवाय नदीकाठची शेती, नगरपालिका, महापालिका आणि गावांच्या पिण्यासाठी पाणी तीन टीएमसी लागेल. अशी एकूण ९ टीएमसी पाण्याची गरज आहे. जून महिन्याअखेर १० टीएमसी पाणी शिल्लक ठेवण्याचे कोयना धरण प्रशासनाचे नियोजन आहे. त्यानंतर पाऊस लांबला तर हाच साठा उपयुक्त ठरणार आहे.
चांदोलीत १३ टीएमसी
चांदोली धरणात (Chandoli Dam) सध्या १३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. पैकी ५.६९ टीएमसी उपयुक्त साठा आहे. म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्प आणि वारणा नदीकाठासह कृष्णेवरील राजापूरपर्यंतच्या गावांना पाण्यासाठी व शेतीसाठी हा साठा पुरेसा आहे. जतला पुरेसे पाणी पोहोचले नाही. परिणामी, जूनमध्ये म्हैसाळचा सहावा टप्पा पूर्ण क्षमतेने चालवावा लागेल आणि त्यासाठी हा साठा गरजेचा असेल.
पाणी दिल्यास करार हवा
कर्नाटकला या स्थितीतही दोन ते तीन टीएमसी पाणी देणे शक्य होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे, कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. याआधी महाराष्ट्राने कर्नाटकला विकत पाणीपुरवठा केला होता. गेल्या काही वर्षांत कर्नाटकने जत सीमा भागातील शेतीला पाणीपुरवठा केला आहे. मात्र, तो कागदोपत्री नाही. तसा कोणताही करार नाही. यावेळी कर्नाटकला पाणी देताना सीमा भागातील योजनांतून जतच्या शिवारात पाणी सोडण्याबाबत करार व्हावा, अशी अपेक्षा आहे.
कोयना धरणातील सध्याचा पाणीसाठा १८ टीएमसी असून, पैकी वीजनिर्मिती, सिंचन, पिण्यासाठी ८ ते ९ टीएमसी पाणी राखीव ठेवावे लागेल. पाऊस लांबला तर तजवीज महत्त्वाची आहे.
- नीतेश पोतदार, कार्यकारी अभियंता, कोयना