हे अपहरण नव्हे; तर म्हणे कर्नाटक पोलिसांची कारवाई

Karnataka Police Arrested Two Youth In Padali Khurd
Karnataka Police Arrested Two Youth In Padali Khurd

कोल्हापूर - पाडळी खुर्द (ता.करवीर) येथील दलित वसाहतीतील दोघा तरुणांचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावासह परिसरात पसरली. कोण होते? कसे आले? कोठून आले? या चर्चेला उधाण आले. त्यामुळे पाडळी परिसरातील इतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, हे अपहरण नव्हे; तर कर्नाटकातून झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात दोघा तरुणांना संशयित म्हणून कर्नाटकचे पोलिस ताब्यात घेऊन गेल्याचा निर्वाळा करवीरचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिल्यामुळे अपहरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 

पाडळी खुर्द येथील रेणुका मंदिराजवळ असणाऱ्या बस स्टॉपजवळ दुपारी तीन वाजता दोन चारचाकी वाहने उभी होती. त्यांपैकी दाढी, लांब केसांना बो लावलेल्या आणि पायात चप्पल घातलेल्या एका इसमाने तिथे एका दुकानात खाऊचे पाकीट घेतले. त्यानंतर त्यांच्यासोबतच्या एकाने कोणाला तरी मोबाइलवरून संपर्क साधला. "मी कुरिअरवाला आहे. तुमचं कुरिअर आलं आहे, बस स्टॉपजवळून ते घेऊन जा, 
तुमचे नसेल तर ते रद्द करण्यासाठी सही करून जा,' असा फोन पाडळीमधील हरिजन वस्तीतील त्या तरुणाला गेला. तो तरुण बस स्टॉपजवळ येताच बालिंगा-कोगे रस्त्यावर थांबलेल्या चारचाकी वाहनात त्याला व त्याच्या दुसऱ्या एका मित्राला बळजबरीने बसवले. यावर तिथे असणाऱ्या एका तरुणाने कोण आहे? तुम्ही मुलांना गाडीत घालून कोठे घेऊन निघाला? असा प्रश्‍न केला. यावर एकाने आम्ही कर्नाटक पोलिस असल्याचे सांगितले; पण त्यांच्याकडे पाहून तुम्ही पोलिस वाटत नाही, असे सांगत असतानाच तिथे उभे असणारी वाहने कोल्हापूरच्या दिशेने सुसाट गेली. त्यामुळे दोघा तरुणांच्या अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावागावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित तरुणांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना पाचारण केले. त्यांनतर करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आणि करवीर पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी पाडळी खुर्द गाठले आणि माहिती घेऊन तत्काळ नाकाबंदीच्या सूचना दिल्या. त्यानंतर कोगनोळी नाक्‍यावर तरुणांना घेऊन जाणारे वाहन सापडले. त्यानंतर त्यांची चौकशी व खात्री करून त्यांना कर्नाटक पोलिसांसोबत पाठविले. 

अमृतकर, पाटील दहा मिनिटांत गावात 

दोघा तरुणांचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच, कोल्हापूरपासून दहा किलोमीटरवर असणाऱ्या पाडळी खुर्दमध्ये करवीर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आणि करवीर पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील दाखल झाले. त्यामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला. 

सोशल मीडियावरून अफवा 

पाडळी खुर्दमध्ये शाळेकरी चार मुलांचे अपहरण अशी अफवा सोशल मीडियावर फिरू लागली. त्यामुळे सायंकाळी मराठी शाळेतील मुलांना घेण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. 

दोघेही घरी परतले 

कर्नाटकमध्ये एका दरोड्यात सामील असणारा मुलगा पाडळी खुर्द येथे राहायला आला होता. कर्नाटकमधून आलेल्या तरुणाने आपला मोबाईल बंद करून पकडून नेलेल्या दोन तरुणांच्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितले होते. दरम्यान, मूळ आरोपी सापडल्यानंतर त्याच्या मोबाईल नंबरवरून कोणाकोणाला फोन केला होता, हे तपासल्यामुळे या दोन तरुणांचे फोन नंबर दिसले. त्यामुळे त्यांना चौकशी करण्यासाठी नेले होते; मात्र त्यांचा यात सहभाग नसल्याने कर्नाटक पोलिसांनी त्यांना चौकशी करून सोडून दिले. सायंकाळी ते दोघे पाडळी येथे घरी आले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com