कर्नाटकचा निकाल; काँग्रेससाठी धोक्‍याची घंटा

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 18 मे 2018

सोलापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर असलेल्या मतदार संघांत भाजपचे बहुतांश उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लिंगायत फॅक्‍टर निर्णायक भूमिका बजावणार असून, हक्काचा मतदार काँग्रेसपासून दूरावण्याची शक्‍यता आहे. 

सोलापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर असलेल्या मतदार संघांत भाजपचे बहुतांश उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लिंगायत फॅक्‍टर निर्णायक भूमिका बजावणार असून, हक्काचा मतदार काँग्रेसपासून दूरावण्याची शक्‍यता आहे. 

मोदी सरकारने दिलेली आश्‍वासने फोल ठरली, महागाई वाढली, जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त अशा स्थितीत भाजपला कर्नाटकमध्ये अनपेक्षित यश मिळाले. त्याला लिंगायत समाज महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. लिंगायत समाज हा परंपरागत काँग्रेसचा मतदार आहे. पण स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना या विषयावरून सध्या रणकंदन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसला फार काळजी घ्यावी लागणार आहे. 

सोलापूर मतदारसंघापुरता विचार केला असता लिंगायत समाजाचे प्राबल्य या मतदार संघात मोठ्या प्रमाणावर आहे. विशेषतः शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर मतदार संघात या समाजाची निर्णायक मते आहेत. शहर उत्तर विधानसभा मतदार संघात सध्या लिंगायत समाजाचेच विजय देशमुख आमदार आहेत. कर्नाटकातील पंतप्रधानांच्या सभांची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती आणि त्यांनी ती यशस्वी पारही पाडली. भाजपला मिळालेल्या यशामुळे त्यांना ताकद मिळाली.

गेल्या 15 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या शहर उत्तर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसनेही व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. श्री. देशमुख यांच्या विरोधात यंदा सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांना उतरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे लिंगायत मतांची विभागणी होण्याची शक्‍यता आहे. हे ओळखून भाजपकडूनही व्यूहरचना आखली जात आहे. लिंगायत मतांची विभागणी झाली तरी, दलित आणि दलितेतर मते मिळवून बालेकिल्ला मजबूत करण्याची तयारी श्री. देशमुख यांनी सुरू केली आहे. सिद्धेश्‍वर देवस्थान समितीच्या अंतर्गत राजकारणावरून काडादी यांच्याविरुद्ध वातावरण तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री. काडादी यांना अध्यक्षपदावरून हटवून समिती बरखास्त करण्यासाठी लिंगायत समाजातीलच एका गटाने पत्रकार परिषद घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर आगामी निवडणुकीत लिंगायत फॅक्‍टरचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्‍यता असून, कर्नाटकातील भाजपला मिळालेले यश हे काँग्रेससाठी धोक्‍याची घंटाच आहे. 

डाव यशस्वी झाला नाही 
लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा देण्याचा प्रस्ताव सिद्धरामय्या सरकारने मंजूर करून लिंगायत मते खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे झाले नाही. उलट केवळ लिंगायतच नव्हे तर दलितबहुल भागात भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे सिद्धरामय्या सरकारचा डाव यशस्वी झाला नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर "अमिष' दाखविण्याचा प्रकार यशस्वी होत नसल्याचेच या निर्णयातून स्पष्ट झाले.

Web Title: Karnataka's Result; The warning for the Congress