कार्तिकी यात्रेत सुविधा देणारः अतुल भोसले 

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर : कार्तिकी यात्रेत पाच ठिकाणी शुध्द पाणी पुरवणारी मशीन (वॉटर एटीएम), दर्शन मंडपात मोबाईलसाठी हॉटस्पॉट सुविधा, दर्शन मंडपात तीन दिवस मोफत चहा, सुरक्षेसाठी जादा सीसीटिव्ही कॅमेरे आदी व्यवस्था केली जाणार आहे. यात्रेत भाविकांना फरक जाणवेल इतकी चांगली व्यवस्था मंदिर समितीकडून केली जाणार आहे. कार्तिकी यात्रेचे वेळी प्रायोगिक तत्वावर टोकन पध्दतीने दर्शन व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी "सकाळ" शी बोलताना दिली. 

भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्यांची आज बैठक झाली. त्यानंतर त्यांनी माहिती दिली ते म्हणाले, कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठलाची महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. भाविकांना तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागू नये यासाठी टोकन पध्दत सुरु केली जाणार असून यात्रेत पन्नास ते शंभर लोकांना प्रायोगिक तत्वावर टोकन पध्दतीने दर्शनाला सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दोन, तीन महिन्यात भाविकांना या व्यवस्थेची माहिती देऊन टोकन व्यवस्था सर्वांसाठी कार्यान्वित केली जाणार आहे. 

केवळ दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था समितीच्या माध्यमातून केली जात होती परंतु आता रांगे बरोबरच शहरात पाच ठिकाणी पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी वॉटर एटीएम मशीन बसवण्यात येणार आहेत. त्याव्दारे अत्यल्प दरात शुध्द पाणी उपलब्ध होणार आहे. 

दर्शन मंडपामध्ये बीएसएनएल कडून हॉटस्पॉट ऍन्टेना बसवण्यात येणार असून त्यामुळे भाविकांना मोबाईलसाठी हॉटस्पॉटची सुविधा मिळणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या स्तनदा मातांसाठी दर्शन मंडपालगत दोन ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना केली जाणार आहे. या शिवाय सुरक्षिततेसाठी यंदा दर्शन मंडपापासून पत्राशेड पर्यंत जादा सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मंदिर समितीच्या माध्यमातून शहरात पाच ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. स्वच्छता व्यवस्थेकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाणार आहे. 

डॉ. भोसले यांचे मुंबईतील मित्र डॉक्‍टर नोझर शेरियार यांनी नोटामोजणी मशीन देणगी दिले असून ते श्री.भोसले यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. 

बैठकीस सदस्य नगराध्यक्षा साधना भोसले, गहिनीनाथ महाराज औसेकर, भास्करगिरी महाराज, संभाजी शिंदे, सचिन अधटराव, शकुंतला नडगिरे तसेच प्रांताधिकारी तथा कार्यकारी अधिकारी डॉ.विजय देशमुख उपस्थित होते. 

राम कदमांची सलग तिसऱ्यांदा दांडी
आमदार राम कदम (मुंबई) यांची मंदिर समितीवर नियुक्ती झाल्यानंतर दोन्ही बैठकांना त्यांनी दांडी मारली होती. त्यामुळे आजच्या तिसऱ्या बैठकीला तरी ते उपस्थित रहातील अशी अपेक्षा होती परंतु श्री.कदम आजही बैठकीस आले नाहीत. सलग तिसऱ्यांदा ते अनुपस्थित राहिल्याबद्दल समितीचे अध्यक्ष डॉ.भोसले यांना विचारले असता ते म्हणाले श्री.कदम यांनी आज ते काही कारणांमुळे अनुपस्थित रहात असल्याविषयी अर्ज समितीकडे पाठवला होता. तो अर्ज बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. 

व्यवस्थापक विलास महाजन पदमुक्त
नायब तहसिलदार असलेले विलास महाजन हे 11 सप्टेंबर 2014 पासून मंदिर समितीचे व्यवस्थापक म्हणून काम पहात होते. काही घटनांमुळे ते वादग्रस्त झाले होते. त्यांना मध्यंतरी मारहाण ही झाली होती. त्यांना पदमुक्त करण्याचा निर्णय आज झाला. त्यांची आता पुन्हा महसूल विभागात नियुक्ती होणार आहे. कार्तिकी यात्रे पर्यंत मंदिर समितीचे लेखाधिकारी आर.आर. वाळूजकर यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. यात्रेनंतर पुन्हा कायम नवीन नायब तहसिलदार दर्जाच्या व्यक्तीची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती होणार आहे. 

आमदार राम कदमांचा खुलासा 
श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या पहिल्या आणि दुसऱ्या बैठकीच्या वेळी मी परदेश दौऱ्यावर होतो. आत्ता मी माझ्या वयस्कर आई वडीलांना घेऊन चारोधाम यात्रेवर आहे. त्यामुळे आजच्या तिसऱ्या बैठकीला देखील मी दुर्दैवाने येऊ शकलो नाही. शरीराने जरी मी गैरहजर असलो तरी मनाने मी अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांच्या सर्व निर्णयाशी सहमत आहे. पुढच्या बैठकीला मी आवर्जुन उपस्थित राहणार आहे असे आमदार राम कदम यांनी "सकाळ" शी बोलताना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com