करवीरमध्येही काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी करावी - हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

कोल्हापूर - काँग्रेसने सोयीच्या चार तालुक्‍यांत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे. करवीरमध्येही आघाडी झाली पाहिजे, असे आमचे मत आहे. त्यासाठी मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कागल वगळता एका तालुक्‍यात भाजपसोबतही आघाडी होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोल्हापूर - काँग्रेसने सोयीच्या चार तालुक्‍यांत राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे. करवीरमध्येही आघाडी झाली पाहिजे, असे आमचे मत आहे. त्यासाठी मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कागल वगळता एका तालुक्‍यात भाजपसोबतही आघाडी होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ४५ ते ५० ठिकाणी घड्याळ चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करणार असून, त्यांपैकी ३५ जागांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. आघाड्या करण्यासंदर्भात चर्चा, बैठका सुरू आहेत. काल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत चार तालुक्‍यांत आघाडी करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

यावर आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘निवडणूक जिल्हा परिषदेची असल्यामुळे केवळ चार तालुक्‍यांतच आघाडी करून कसे चालणार. त्यामध्ये करवीर का नाही. करवीरमध्येही आघाडी व्हावी, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आघाडी करावयाची असेल तर चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी काँग्रसने पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. 

राष्ट्रवादी पक्ष कागल, भुदरगड, राधानगरी तालुक्‍यांतील जिल्हा परिषदेच्या २७ जागा, तसेच हातकणंगले ५, शिरोळ ४, शाहूवाडी २, पन्हाळा २, करवीर ५ आदी ४५ ते ५० ठिकाणी घड्याळ चिन्हावर उमेदवार उभे करणार आहे.

राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादी पक्ष एका तालुक्‍यात मात्र भारतीय जनता पक्षासोबत आघाडी करणार आहे. ही आघाडी कागल तालुका वगळून असणार आहे. काही तालुक्‍यांत स्थानिक पातळीवर आघाडी करण्यात येईल.’’ यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भैया माने उपस्थित होते.

कागलमधून सर्वाधिक अर्ज
राष्ट्रवादीकडून सर्वांत अधिक कागल तालुक्‍यातून १०२ जणांनी उमेदवारी मागणी अर्ज नेले आहेत. याशिवाय गगनबावडा १५, पन्हाळा २५, शाहूवाडी १०, हातकणंगले ६५, शिरोळ ७५, चंदगड ४०, आजरा ३५, भुदरगड ६०, करवीर ३५, गडहिंग्लज ९५ व राधानगरी तालुक्‍यातून ७० जणांनी उमेदवारी मागणी अर्ज नेले आहेत.

राष्ट्रवादीच्या गुरुवारपासून मुलाखती
कोल्हापूर - राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती गुरुवार (ता. १९) व शुक्रवार (ता. २०) या दोन दिवसांत घेण्यात येणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या वेळेत या मुलाखती होतील. निरीक्षक दिलीप पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, युवराज पाटील आदींच्या उपस्थितीत मुलाखती होणार आहे. पहिल्या दिवशी गुरुवारी (ता. १९) राधानगरी (सकाळी १० ते ११.१५), भुदरगड (सकाळी ११.१५ ते दुपारी १२.३०), आजरा (१२.३० ते १.३०), गडहिंग्लज (२.३० ते ३.३०), चंदगड (३.३० ते ४.३०), कागल (४.३० ते ५.३०) या तालुक्‍यातील इच्छुकांच्या मुलाखती होतील. शुक्रवारी (ता. २०) करवीर (सकाळी १० ते ११.३०), गगनबावडा (सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०), पन्हाळा (१२.३० ते १.३०), शाहूवाडी (२.३० ते ३.३०), हातकणंगले (३.३० ते ४.३०) व शिरोळ (४.३० ते ५.३०) या तालुक्‍यातील इच्छुकांच्या मुलाखती होतील.

Web Title: karvir should lead Congress-NCP