वणव्याच्या झळा सोसत पुष्पवनस्पतीची उभारी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सातारा - दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कास पठारावर फेब्रुवारी महिन्यात लावण्यात आलेल्या वणव्यात काही हेक्‍टर क्षेत्र जळून खाक झाले होते. या वणव्यामुळे त्या क्षेत्रात पुन्हा पुष्पवनस्पती येतील का? अशी शंका होती. प्रतिकूल परिस्थितीत सुप्त पडून राहून अनुकूलता मिळाल्यानंतर पुन्हा उभारी घेणं, हे ‘कास’च्या जैवविविधतेचं वैशिष्ट्य आहे. या लौकिकास अधोरेखित करत ‘यूफोरबिया पाचगनेनसिस’ या पुष्पवनस्पतीने कास पठारावर दर्शन दिले आहे.

यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर कुलकर्णी याने ही फुले कॅमेराबद्ध केली आहेत. सागर हा प्राणिशास्त्र विषय घेऊन एमएस्सीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. दोन दिवसांपूर्वी कास पठारावर निरीक्षण करत असताना त्याला ही पुष्पवनस्पती दृष्टीस पडली. विशेष म्हणजे फेब्रुवारीमध्ये पठारावर अज्ञाताने लावलेल्या आगीत काही हेक्‍टर क्षेत्रातील सुकलेले गवत जळून खाक झाले होते. त्याच ठिकाणी ही पुष्पवनस्पती त्याच्या दृष्टीस पडली. 

कास पठारावर सर्वत्र खडक असून, अत्यंत कमी प्रमाणात मातीचा थर आहे. त्यामुळे पठारावर मोठी झाडे अभावानेच दिसतात. या मातीखाली पुष्पवनस्तींचे बीज महिनोंमहिने सुप्तावस्थेत पडून राहते. अनुकूल परिस्थिीत निर्माण झाल्यानंतर वनस्पती पुन्हा उभारी घेते. याच श्रुंखलेतील ‘यूफोरबिया पाचगनेनसिस’ ही प्रदेशनिष्ठ वनस्पती आहे. 

फेब्रुवारीमध्ये कास पठारावर काही हेक्‍टर क्षेत्रा वणवा पसरला होता. त्याठिकाणी फुलांच्या मोसमात पुष्पवनस्पती उगवतील की नाही, अशी शंका वनस्पती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. वणव्यातील आगीची धक मातीखाली असलेल्या बिजाच्या स्तरापर्यंत पोचली नसेल तर धोका टळला असे सांगता येईल. ‘यूफोरबिया पाचगनेनसिस’ ही वनस्पती पुन्हा उगवल्याने पर्यावरणप्रेमींना आशा निर्माण झाल्या आहेत. 

काय आहे ‘यूफोरबिया पाचगनेनसिस’!
‘यूफोरबिया पाचगनेनसिस’ ही पश्‍चिम घाटातील प्रदेशनिष्ठ पुष्पवनस्पती आहे. भरउन्हात ती उमलते. तिचे कंद जमिनीखाली असतात. फुलोरा फक्त वर येतो. अतिशय आकर्षक असलेली ही वनस्पती एप्रिल-मे महिन्यांत फुलते. साधारण पाच ते आठ सेंटिमीटर उंचीच्या या वनस्पतीचे फूल डोळ्यांनी सहज पाहता येते.

Web Title: kas pathar fire plant