‘कास पठारा’वर गर्दीमुळे ताण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

सुटीच्या दिवशी होणाऱ्या प्रचंड गर्दीने कास पठाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कास पठार कार्यकारी समितीवर ताण येत असून, दोन ऑक्‍टोबर रोजी तर या गर्दीने उच्चांक मोडल्याने पर्यटक व व्यवस्थापन समिती या दोघांनाही याचा त्रास सहन करावा लागला.

कास (जि. सातारा) - सुटीच्या दिवशी होणाऱ्या प्रचंड गर्दीने कास पठाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कास पठार कार्यकारी समितीवर ताण येत असून, दोन ऑक्‍टोबर रोजी तर या गर्दीने उच्चांक मोडल्याने पर्यटक व व्यवस्थापन समिती या दोघांनाही याचा त्रास सहन करावा लागला.

अनियंत्रित गर्दीचा त्रास जसा पर्यटक व व्यवस्थापन समितीला होत आहे, तसाच या मानवी गर्दीने येथील दुर्मीळ निसर्गसंपदाही धोक्‍यात येण्याची शक्‍यता अभ्यासक व्यक्त करत आहेत. कासचा हंगाम एक सप्टेंबरपासून सुरू झाला. यावर्षी पावसामुळे फुले उशिरा फुलल्याने हंगामाची सुरवात उशिरा झाली. तरीही सततच्या पावसाने यावर्षी पठारावर फुलांचे प्रमाण खूप चांगले आहे. साधारणतः दीड महिने चालणाऱ्या या फुलोत्सवास शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीच लोक आवर्जून येत असल्याने सुटीच्या दिवशी पर्यटकांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त होत आहे. कास पठारावर येण्यासाठी ‘ऑनलाइन बुकिंग’ व्यवस्था असली तरी तिची मर्यादा तीन हजार पर्यटक एका दिवशी एवढी आहे. गेले महिनाभर सुटीच्या दिवशीचे ‘ऑनलाइन बुकिंग’ अगोदरच ‘फुल्ल’ होत असल्याने अनेक जण थेट पठारावर येतात. येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होवू नये म्हणून समितीमार्फत प्रवेशद्वारावर तिकीट घेऊन प्रवेश दिला जातो. पण, या थेट येणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड होत असल्याने सर्व व्यवस्था कोलमडून जात आहे.  

बुधवारी (ता. दोन) तर सकाळी दहा वाजताच गाड्यांच्या पार्किंगची ठिकाणे फुल्ल झाली. पठारावरही अनेकांनी इकडेतिकडे वाहने लावल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. शेवटी दुपारी सर्वच परिस्थिती हाताबाहेर जावू लागताच समितीने पठारावर जाणारा रस्ता बंद करून एकीव, सह्याद्रीनगरमार्गे वाहतूक वळवली. यामुळे पर्यटक व समितीचे स्वयंसेवक यांच्यामधे हमरीतुमरी होऊ लागली. अनेकांना याचा फटका बसला. नाराजीने अनेकांनी माघारी फिरणे पसंत केले. 

समितीकडे साधारणतः १३० स्वयंसेवक असून, एवढी माणसे दहा हजारांच्या वरच्या गर्दीला कसे हाताळणार? असा प्रश्नही त्यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. कासचा हंगाम आता शेवटच्या टप्प्याकडे सरकत असून, अजून दहा ते १५ दिवस पाऊस अधूनमधून पडत राहिल्यास फुले टिकणार आहेत. त्यामुळे येणारे सुटीचे दिवस गर्दीचेच ठरणार असल्याने या समस्येवर उपाय शोधणे अगत्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kas Pathar Nature Public Mob Tension