स्वातंत्र्यसेनानी इंदुमती पाटणकर यांचे कासेगाव येथे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

कासेगाव - स्वातंत्र्यसेनानी इंदुमती पाटणकर (वय 93) यांचे आज रात्री साडेआठच्या सुमारास कासेगाव (ता. वाळवा) येथील राहत्या घरी निधन झाले. गेले सहा महिने त्या अंथरुणाला खिळून होत्या. वयाच्या 92 वर्षांपर्यंत त्या विविध कार्यांत सक्रिय होत्या. अलीकडे त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने डॉक्‍टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या त्या मातोश्री होत.

इंदुमती पाटणकर या मूळच्या इंदोली, ता. कऱ्हाड येथील. 1925 चा त्यांचा जन्म आहे. स्वातंत्र्यसैनिक बाबूजी पाटणकर यांच्याशी 1940 मध्ये त्या विवाहबद्ध झाल्या. माहेरीच त्यांना देशभक्तीचे धडे मिळाले. त्यामुळे त्यांनी स्वतःला पतीसोबत स्वातंत्र्यसंग्रामात झोकून दिले.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या "पत्री सरकार'च्या त्या आधारस्तंभ होत्या. कै. लक्ष्मीबाई नायकवडी यांच्यासोबत त्या भूमिगत कार्यकर्त्यांना भाजी-भाकरी पोचवीत. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, पांडू मास्तर, शेख चाचा यांच्यासोबत 1947 पर्यंत त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधातील लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील त्यांनी विविध प्रकारची आंदोलने उभारली. सामान्य, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. शेतमजूर महिलांसाठी त्यांनी 1995 मध्ये मोठा लढा उभारला होता. तळागाळातील व मागास लोकांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत बाबूजी यांच्यासोबत त्यांचाही सहभाग होता. त्यांनी स्वतः शिक्षिका म्हणून अध्यापनही केले.

उद्या (शनिवारी) सकाळी नऊ वाजता कासेगावातील प्रमुख मार्गांवरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय प्रबोधन संस्थेच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे मुलगा डॉ. भारत, सून गेल अम्वेट आणि नात प्राची असा परिवार आहे.

Web Title: kasegav indumati patankar death