दोन लाख टन सेंद्रिय खताचा ऱ्हास

विकास जाधव
सोमवार, 26 मार्च 2018

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व उत्पादनवाढीसाठी पाचट व्यवस्थापन ही काळाजी गरज आहे. पाचट व्यवस्थानामुळे सेंद्रिय कर्बात वाढ, भांडवली खर्च व पाण्याची मोठी बचत होते.
 -अंकुश सोनावले,  कृषी सहायक, नागठाणे

काशीळ - जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. पाचटापासून शेतजमिनीची सुपीकता तसेच उत्पादन वाढीत होत असलेला फायद्यांकडे शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. याही गाळप हंगामात ७० टक्के क्षेत्रावरील पाचट जाळली गेल्याचा अंदाज व्यक्त होत असून, त्यातून दीड ते दोन लाख टन सेंद्रिय खताचा ऱ्हास झाला आहे. 

जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्‍याचा अपवाद वगळता सर्वच तालुक्‍यांत उसाचे पीक घेतले जात आहे. दरातील वाढलेली शाश्‍वतता, पाण्याच्या उपलब्धततेमुळे उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. २०१७-१८ मधील गाळपासाठी जिल्ह्यात ८० हजार हेक्‍टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होता.

त्यामध्ये ६० हजार हेक्‍टर आडसाली, पूर्व व सुरू हंगामातील उसाचा समावेश आहे. हा ऊस जवळपास संपत आला आहे. सध्या खोडवा व उशिरा लागवड झालेल्या उसाचे तोडणी व गाळपाचे काम सुरू आहे. आडसाली, पूर्व व सुरू हंगामातील तोडणीचे काम उरकले आहेत. 

जिल्ह्यात २५ ते ३० टक्के शेतकरी पाचट व्यवस्थापनाद्वारे शेतजमिनीची सुपीकता व उत्पादन वाढीसाठी धडपड करत आहेत. उर्वरित शेतकऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांचा पाचट ठेवण्याबाबत गैरसमज झाल्यामुळे पाचट ठेवली जात नसल्याचे दिसून येत आहे. उंदीर आणि पाणी देताना अडचणी येण्याची सबब सांगितली जात आहे. मात्र, पाचटीचे व्यवस्थापन हे शेतीजमीन व उत्पादन वाढीत अत्यंत उपयुक्त दिसते. एक एकर उसाच्या क्षेत्रातील पाचट व्यवस्थापनातून सुमारे साडेचार टन सेंद्रिय खत मिळते. तणनियंत्रण, पाण्याची बचत तसेच कमी प्रमाणात रासायनिक खते एकणूच भांडवली खर्चात बचत होते. सध्या जिल्ह्यातील ५० ते ५५ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पाचट जाळली असल्याने दीड ते दोन लाख टन सेंद्रिय खताचा ऱ्हास झाला आहे.

जनजागृती कार्यक्रम राबवा
जिल्ह्यात सध्या १५ साखर कारखाने आहेत. पुढील हंगामात ही संख्या १७ वर जाण्याची शक्‍यता आहे. नवीन लागवड झालेला ऊस आणि खोडवा ऊस याच कारखान्यांकडून गाळप केला जाणार आहे. उसाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी पाचट व्यवस्थापनासाठी सर्व कारखान्यांनी एकत्र येऊन पाचट व्यवस्थापनासाठी कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाचट व्यवस्थापन करावे, यासाठी प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना काही मदत करता येईल, अशा प्रकारची योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. साखर कारखान्यांबरोबरच कृषी विभागाने जनजागृतीसाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

Web Title: kashil news satara news organic fertilizer