‘महावितरण’कडून शेतकऱ्यांना ‘शॉक’

विकास जाधव
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

काशीळ - रखडलेली पीक कर्जमाफी योजना, सोयाबीन खरेदीचा उडालेला बोजबारा हे झटके शेतकऱ्यांना बसत असतानाच आता महावितरण कंपनीने वीज बिलातून ‘शॉक’ देण्याचे काम सुरू केले आहे. कृषिपंपांचे तीन वर्षांपासून कसलेच बिल दिले नसता आता शेतकऱ्यांना एकदम एक लाखांवर वीज बिले पाठवण्यात आली आहेत. महावितरण कंपनीच्या कृत्याने शेतकऱ्यांत कमालीची चीड निर्माण झाली आहे. 

काशीळ - रखडलेली पीक कर्जमाफी योजना, सोयाबीन खरेदीचा उडालेला बोजबारा हे झटके शेतकऱ्यांना बसत असतानाच आता महावितरण कंपनीने वीज बिलातून ‘शॉक’ देण्याचे काम सुरू केले आहे. कृषिपंपांचे तीन वर्षांपासून कसलेच बिल दिले नसता आता शेतकऱ्यांना एकदम एक लाखांवर वीज बिले पाठवण्यात आली आहेत. महावितरण कंपनीच्या कृत्याने शेतकऱ्यांत कमालीची चीड निर्माण झाली आहे. 

शासनाकडून जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी मिळणार का नाही, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रमावस्थता आहे. त्यातच खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन विक्री न करता आल्याने घरी तसेच साठवावे लागल्याने उधार, उसनवारीवर घेऊन शेतकऱ्यांना दिवाळीचा सण साजरा करावा लागला. दिवाळी होताच वीज वितरण करणाऱ्या महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना वर्षभराची एकदमच लाखांची विज बिले पाठवली आहेत. ज्या शेतकऱ्यांना ही बिले पाठवली आहेत, त्या शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून कसलीही बिले दिलेली नव्हती तसेच मीटर रिंडींगही घेतले गेले नाही. नियमित वेळेनुसार कृषी पंपांची बिले आल्यास शेतकऱ्यांना ती भरणे शक्‍य होते. मात्र, ही बिले एकदम आल्याने बिलांचा आखडा फुगला आहे. ५० हजारींपासून लाखावर बिलाची रक्कम गेली आहेत. त्यावर कळस म्हणून या बिलाच्या मूळ रकमेवर व्याज लावण्याचा प्रकार ‘महावितरण’ कंपनीकडून केला असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना या प्रकारची बिले आली आहे. बिलांचे आकडे मोठे असल्याने एकाचवेळी ही बिले भरणे शक्‍य नाही. बिले भरली नाही तर वीज कनेक्‍शन तोडण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे. 

मला २०१४ पासूनचे एकदम एक लाख सहा हजार रुपयांचे वीज बिल आले आहे. इतकी रक्कम एकदम भरणे शक्‍य नसल्याने बिलात सूट तसेच बिलाच्या रकमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज घेतले जाऊ नये. त्याचबरोबर शिल्लक बिलांचे हप्ते पाडून मिळावेत.
- विक्रम साळुंखे, शेतकरी (नागठाणे)

बिलात सूट देण्याची मागणी
‘महावितरण’च्या चुकीच्या कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कंपनीने नियमानुसार व वेळेत ही बिले पाठवली असती तर ती भरणे शक्‍य होते. मात्र, एकदम बिले पाठविल्याने आम्हाला ही भरणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे आलेल्या वीज बिलात ५० टक्के सूट व व्याज न घेता उर्वरित ५० टक्के बिलांचे हप्ते पाडून द्यावेत, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वीज कनेक्‍शन खंडित करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाही या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

Web Title: kashil satara news electricity bill