शेततळ्यांत ७८९ टीसीएम पाणीसाठा होणार

शेततळ्यांत ७८९ टीसीएम पाणीसाठा होणार

जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ला प्रतिसाद; ५८१ तळी पूर्ण, ६८१ प्रगतिपथावर 
काशीळ - जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेस प्रतिसाद वाढला आहे. या योजनेतून ५८१ शेततळी पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेली व अंतिम टप्प्यात असलेल्या शेततळ्यांत या पावसाळ्यात ७८९ टीसीएम पाणीसाठा होणार आहे. यामुळे शेतीस शाश्‍वत पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. 

राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना जाहीर केली. त्यासाठी गेल्या पाच वर्षांत एक वेळ तरी त्या गावाची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जाहीर होणे आवश्‍यक आहे. ही अट ऑक्‍टोबर २०१६ मध्ये शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना सर्वसमावेशक होऊन जिल्ह्यातील एक हजार ७४४ गावांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणे शक्‍य झाले होते. या योजनेतून जिल्ह्यात दोन हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. योजना जाहीर होऊनही सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर मात्र या योजनेस प्रतिसाद वाढला आहे. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे दोन हजार ६८९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये दोन हजार १५४ अर्ज पात्र तर ४६५ अर्ज अपात्र ठरले असून, ७० अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जांपैकी एक हजार ९५७ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. एक हजार ६३५ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या ६८१ शेततळ्यांचे काम सुरू असून, ४६५ शेततळ्यांच्या अनुदानपोटी दोन कोटी दहा लाख ६२ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले. या योजनेस प्रतिसाद वाढला असून, मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. 

७८९ टीसीएम पाणीसाठा 
जिल्ह्यात एक जूनअखेर ५१४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या पावसाळ्यात ही शेततळी भरल्यावर ३३९.२४ टीसीएम पाणीसाठा होणार आहे. तर ६८१ शेततळ्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. या शेततळ्यांत ४५० टीसीएम पाणीसाठा होणार आहे. पूर्ण झालेल्या व अंतिम टप्प्यात असलेल्या शेततळ्यांत सुमारे ७८९ टीसीएम पाणीसाठा होणार असल्याने शेतीला शाश्‍वत पाणी मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com