कासला निघालाय, भांड्यांची चिंता नको! 

कासला निघालाय, भांड्यांची चिंता नको! 

सातारा - समाजमनात पर्यावरणविषयक जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कास तलाव परिसर स्वच्छता मोहीम "सकाळ'च्या पुढाकाराने तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली. या मोहिमेंतर्गत कासमधील स्थानिक व्यावसायिकांकडे जेवणाची भांडी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अल्पश: भाड्याने ही भांडी पर्यटकांना दिली जातात. त्यामुळे कासला वनभोजनाचे नियोजन करत असला तर ताट-वाट्या आदी भांड्यांची चिंता करू नका. तुमची ही चिंता आता मिटली आहे! 

कास तलाव हा सातारकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, माहेरवाशीण असो वा सासरवाशीण अथवा कॉलेज युवक-युवती; प्रत्येक जण कासला वनभोजनासाठी जायला निमित्त शोधत असतो. या जेवणासाठी प्लॅस्टिक द्रोण-ग्लास, थर्माकोलच्या ताट-वाट्या, ग्लासेस आदींचा वापर सर्रास केला जातो. "यूज अँड थ्रो'चे हे साहित्य उपयोगानंतर जागेवरच टाकून जाण्याची आपली सवय आहे. पावसाळी पाण्याबरोबर हा सर्व प्लॅस्टिक-थर्माकोलचा कचरा तलावात वाहून जातो आणि पिण्याच्या पाण्याच्या या तलावातील प्रदूषण वाढते. 

हे सर्व टाळण्यासाठी कास स्वच्छता मोहिमेंतर्गत, कास परिसरात वनभोजनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना ताट-वाट्या, पाण्याचे ग्लास, लहान-मोठी पातेली, झाकणी, पळ्या आदी कासमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हे साहित्य अत्यल्प भाड्यात नागरिकांना देण्यात येत आहे. "सकाळ'चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे यांच्या हस्ते "कासाईदेवी हॉटेल'चे विकास किर्दत व ओमसाई हॉटेलचे विनायक किर्दत यांच्याकडे 100 ताट-वाट्या-पेले, अन्न शिजविण्यासाठी लहान-मोठी पातेली, झाकण्या आदी भांडी सुपूर्त करण्यात आली. या वेळी कास स्वच्छता मोहिमेतील समन्वयक कन्हैय्यालाल राजपुरोहित, डॉ. दीपक निकम, अभय फडतरे, दिनकर जांभळे, अजिनाथ शिराळ, संतोष जगदाळे आदी उपस्थित होते. 

सर्वांच्या योगदानामुळे अल्प भाडे 
कास ग्रामस्थ विनायक किर्दत यांचे "ओमसाई' व विकास किर्दत यांचे "कासाईदेवी' ही दोन हॉटेल आहेत. याठिकाणी पर्यटकांना ताट, वाट्या, लहान-मोठी पातेली, झाकण्या, चमचे आदी भांडी अल्प मोबदल्यात दिली जातात. भांडी खरेदीचा मोठा खर्च दोन्ही व्यावसायिकांनी उचलला आहे. साताऱ्यातील डॉ. दीपक निकम व या मोहिमेतील सहकाऱ्यांनी खर्चाचा काही भार उचलल्याने पर्यटकांना ही भांडी अल्प भाड्यात मिळू लागली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com