अमोल कांबळेला अखेर अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

कातरखटाव - खटावचे तत्कालीन तहसीलदार व सध्याचे तळोदाचे (जि. नंदूरबार) प्रांताधिकारी डॉ. अमोल कांबळे (वय ३१, रा. उस्मानाबाद) याला शासकीय अनुदान गैरव्यवहारप्रकरणी वडूज पोलिसांच्या विशेष पथकाने आज साताऱ्यात सापळा रचून अटक केली. 

कातरखटाव - खटावचे तत्कालीन तहसीलदार व सध्याचे तळोदाचे (जि. नंदूरबार) प्रांताधिकारी डॉ. अमोल कांबळे (वय ३१, रा. उस्मानाबाद) याला शासकीय अनुदान गैरव्यवहारप्रकरणी वडूज पोलिसांच्या विशेष पथकाने आज साताऱ्यात सापळा रचून अटक केली. 

खटाव तालुक्‍यासाठी २०१५ मध्ये आलेल्या दुष्काळ निधीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी कांबळे याच्या विरोधात वडूज पोलिस ठाण्यात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी फिर्याद दाखल केली होती. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केलेल्या चौकशीनंतर कांबळे याने दोन कोटी ९३ लाख दहा हजार ८५८ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात कांबळे याच्यासह प्रवीण सारंग शिंदाडे, चैतन्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, कऱ्हाड मर्चंट क्रेडिट को-ऑप. सोसायटीची वडूज शाखा, आयसीआयसीआय बॅंकेचा तत्कालीन वडूज शाखाप्रमुख राकेश मुनास्वामी नायडू, कऱ्हाड अर्बन को-ऑप. बॅंक शाखा वडूज, विटा मर्चंट को-ऑप. शाखा वडूज यांनाही आरोपी म्हणून सहभागी केले होते. पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के तपास करीत होते. या गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता पोलिसांनी दोन विशेष पथके रवाना केली होती. 

यातील एका पथकास आरोपी अमोल कांबळे हा सातारा येथे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार, सातारा-पुणे महामार्गावर हे पथक तळ ठोकून होते. सायंकाळी सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात अमोल कांबळेस अटक करण्यात आली. या पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक एस. डी. गोसावी यांच्यासह पोलिस कर्मचारी होते. 

कांबळेला प्राथमिक चौकशीसाठी वडूज येथील पोलिस उपअधीक्षकांच्या कार्यालयात आणण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, खटावचे नूतन तहसीलदार बेल्लेकर उपस्थित होते. प्राथमिक चौकशीनंतर कांबळे याला वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 

अटकेसाठी आंदोलन
दरम्यान, कांबळेच्या अटकेसाठी तालुक्‍यातील विविध संघटनांनी निवेदने दिली होती. जनता क्रांती दलाच्या वतीने वडूज पोलिस ठाण्यासमोर बेमुदत धरणे सुरू होते. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता केंगारे, गणेश इंगळे, मोहन अवघडे, प्रवीण कमाने, महादेव सकट, दाऊद मुल्ला, संजय तोरणे आदी सहभागी झाले होते.

Web Title: katarkhatav satara news aamol kambale arrested