मानाच्या कावडी मुंगी घाट सर करणार

रुपेश कदम
मंगळवार, 27 मार्च 2018

मलवडी (सातारा) : सर्वांच्या आकर्षणाचा व श्रध्देचा केंद्रबिंदू असलेला मानाच्या कावडी मुंगी घाटातून वर येण्याचा सोहळा उद्या चैत्र शुद्ध द्वादशीच्या (बुधवार 28 मार्च) दिवशी शिखर शिंगणापूर येथे रंगणार असून या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक शंभू महादेवाच्या नगरीत दाखल झाले आहेत. 

येथील शंभू महादेव यात्रेचा उद्या मुख्य दिवस असून देवाच्या लग्नाची वरात म्हणून मानाच्या कावडी शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करणार आहेत. या कावडी मुंगीघाटातून वर चढविण्याची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील कोथळे गावापासून सर्व कावडी मुंगीघाट हद्दीत प्रवेश करतात. कोथळे गावापासून निघाल्यानंतर सर्व कावडी मुंगीघाटातून चार टप्यात डोंगरावर येतात. कावडी वर चढविण्याचा सोहळा रोमांचित करणारा असतो. यावेळी हजारो भाविक भक्तिरसात तल्लीन झालेले असतात.

भारावलेल्या वातावरणात मानवी हातांची साखळी करुन मुंगीघाट सर करण्याचा सोहळा देहभान हरपणारा असतो. 'हरहर  महादेव'च्या गजरात भाविक अवजड  कावडी अवघड डोंगर कपारीवरून वर चढवितात. सासवड, खळद, शिवरी, एखतपूर, बेलसर, कुंभारवळण, खानवडी, बारामती, इंदापूर, गुणवरे, माळशिरस यांसह अनेक कावडी मुंगीघाट सर करतात. कावडी डोंगर माथ्यावर येताच भाविक ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, फटाक्यांची आतषबाजी करीत टाळ्यांचा गजर करीत आनंद व्यक्त करतात.

सर्वात शेवटी सासवड येथील कैलास काशिनाथ कावडे यांची मानाची कावड मुंगीघाटातून वर येऊन शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर यात्रा उत्सवाची सांगता होते. कावडी सोहळ्यासाठी शंभू महादेवाची नगरी सज्ज झाली असून लाखो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी येथे दाखल झाले आहेत.

Web Title: kavdi covers mungi ghat