राजकीय गट चार; लढाई आरपार

गोरख चव्हाण
रविवार, 16 जुलै 2017

कवठेमहांकाळमध्ये २९ ग्रामपंचायतींसाठी ‘टशन’ - कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू 

कवठेमहांकाळ - तालुक्‍यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकोणतीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. ज्या ज्या गावात निवडणुका होणार आहेत, त्या गावात खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील  यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. 

कवठेमहांकाळमध्ये २९ ग्रामपंचायतींसाठी ‘टशन’ - कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू 

कवठेमहांकाळ - तालुक्‍यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकोणतीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. ज्या ज्या गावात निवडणुका होणार आहेत, त्या गावात खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील  यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. 

त्यातच माजी मंत्री अजितराव घोरपडे व महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांनी संपर्क वाढविला आहे. एकंदरीतच कवठेमहांकाळ तालुक्‍यात होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीचे सिंहासन ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्ते लागीर झाले आहेत. यातच थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय असल्याने इच्छुकांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.

तालुक्‍यात पहिल्या टप्प्यातील एकोणतीस  ग्रामपंचायतींच्या निवडणुका ऑक्‍टोबर-नोव्हेंबरला आहेत. यात खरशिंग, हिंगणगाव, शिंदेवाडी, कोंगनोळी, विठूरायाचीवाडी, लांडगेवाडी, आरेवाडी, अलकुड (एम), नागज, शिरढोण, सराटी, मळणगाव, केरेवाडी, आगळगाव, लंगरपेठ, रांजणी, चुडेखिंडी, लोणारवाडी, घाटनांद्रे, कुची, वाघोली, जाखापूर, हरोली, बोरगाव, कुकटोळी, जायगव्हाण, शेळकेवाडी, अलकूड (एस), ढालेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होत आहेत. 

आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणूक निमित्ताने तालुक्‍यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. यात गत  काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खासदार संजय पाटील व काँग्रेस यांची परिवर्तन आघाडी, तर माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार सुमन पाटील, महांकालीच्या अध्यक्षा अनिता सगरे यांची स्वाभिमानी आघाडीत लढत झाली. यामध्ये स्वाभिमानी आघाडीने तालुक्‍यात जोरदार मुसंडी मारली, तर परिवर्तन आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत हाच प्रयोग होणार की स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार हे काही दिवसांतच समजेल. तूर्तास अद्यापही कोणत्याही नेत्यांनी याबाबतचे मौन पाळले आहे.

तालुक्‍यात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने खासदार  संजय पाटील यांनी संपर्क वाढविला आहे. एकीकडे खासदारांनी संपर्क वाढविल्यानंतर आमदार सुमन पाटील, महांकालीच्या अध्यक्षा अनिता सगरे यांनी दौरे वाढवित कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रादेशिक  पाणीपुरवठा व म्हैसाळ, टेंभू पूर्ततेसाठी आक्रमक झाल्या आहेत. यातच माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी मात्र अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. तालुक्‍यात सुरू झालेल्या नेत्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्ते रिचार्ज  झाले आहे. त्याचबरोबरच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. 

येथे राहणार चुरस
खरशिंग, हिंगणगाव, कोंगनोळी, लांडगेवाडी, आरेवाडी, नागज, शिरढोण, मळणगाव, आगळगाव, रांजणी, घाटनांद्रे, कुची, हरोली, बोरगाव, कुकटोळी या मोठ्या ग्रामपंचायती आहेत. त्याचबरोबरच इतरही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होत असल्याने राजकीयदृष्ट्या त्याही महत्त्वाच्या आहेत.

थेट सरपंचपदामुळे चुरस
आगामी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचपदाचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी जोरदार चुरस होण्याची शक्‍यता आहे. सरपंचपद थेट जनतेतून असल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, किसमें कितना है दमची चर्चा आहे.

Web Title: kavthemahankal sangli news politics in grampanchyat election