अनुकंपाची फाइल त्वरित ठेवा 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

■ "सीईओ' वायचळ यांच्या सूचना 
■ ऍड. सचिन देशमुख यांनी दिले पत्र 
■ अचानक मृत्यू झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावर
■ अनुकंपाने भरण्याचा विषय अद्यापही प्रलंबित

सोलापूर : जिल्हा परिषदेत अनुकंपा भरतीची फाइल अनेक वर्षांपासून बंद स्थितीत आहे. त्याची नेमकी माहिती काय आहे, हे कागदोपत्री माझ्यासमोर ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी आज सामान्य प्रशासन विभागाला दिल्या आहेत. त्याचबरोबर हा विषय त्वरित मार्गी लावावा, या मागणीचे पत्र जिल्हा परिषद सदस्य ऍड. सचिन देशमुख यांनी श्री. वायचळ यांना दिले आहे. 

हेही वाचा : एकही कारखाना सुरु नाही तरीही आठ हजार मेट्रिक टन  ऊस गाळप 

"कुठे अडले अनुकंपाचे घोडे?' या मथळ्याखाली आज "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वायचळ यांनी सामान्य प्रशासन विभागाला ती फाइल त्वरित सहीसाठी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य ऍड. देशमुख यांनीही या भरतीबाबत गांभीर्याने विचार करून सेवाज्येष्ठतेनुसार व गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची रिक्त जागेवर त्वरित भरती करण्याची मागणी श्री. वायचळ यांच्याकडे केली आहे. नोकरीत असताना अचानक मृत्यू झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. त्या कुटुंबाला उदरनिर्वाह करणे जिकिरीचे जाते. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेऊन तो मार्गी लावणे गरजेचे आहे. 

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी 309 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार केली आहे. त्या प्रतीक्षा यादीतील अर्जांची छाननी होऊन जिल्हा परिषदेत संवर्गनिहाय रिक्त असलेल्या जागा अनुकंपाने भरण्याचा विषय अद्यापही प्रलंबित राहिला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा मुद्दा पुढे करून हा विषय टाळला जात आहे. त्यावरूनच श्री. वायचळ यांनी याबाबतही जी काही वस्तुस्थिती आहे, त्याप्रकारे फाइल आपल्याकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील एक-दोन दिवसात फाइल आपल्याकडे येईल, असेही श्री. वायचळ यांनी "सकाळ'ला सांगितले. 

काकाणी यांनी दिले होते आदेश 
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेतील जवळपास 72 जणांना अनुकंपाने नियुक्तीचे आदेश दिले होते. हे आदेश देताना त्यांनी अतिशय पारदर्शक प्रक्रिया राबविली होती. उमेदवारांना नियुक्ती देताना त्यांचे समुपदेशन केले होते. त्यांना अपेक्षित असलेल्या रिक्त जागी त्यांच्या गुणवत्तेनुसार नियुक्ती दिली होती. तशाच प्रकारची भरती प्रक्रिया यावेळीही राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यात श्री. वायचळ यशस्वी होतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

भरती प्रक्रिया तातडीने राबवा
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लावणे आवश्‍यक आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्यथा समजून घेणे आवश्‍यक आहे. त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी ही भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. 
ऍड. सचिन देशमुख, सदस्य 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keep the compassion file right away