परदेशी चलनाद्वारे फसवणुकीचा प्रयत्न; केनियन नागरिकास अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

संशयित इसाह हा कोल्हापुरातील कोहिनूर हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमध्ये सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडील साहित्याच्या माध्यमातून आठ कोटी ४० लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक होऊ शकली असती, अशी माहिती पोलिस अधीक्षक देशमुख यांनी दिली.

कोल्हापूर - परदेशी चलन भारतीय चलनामध्ये रूपांतरीत करून देण्याचे आमिष दाखवून ६३ लाखांच्या फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या एका केनियन नागरिकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने अटक केली. मुथाय इसाह (वय ४५, रा. नैरोबी, केनिया) असे संशयिताचे नाव आहे.  

व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्याच्याकडील २०० अमेरिकन डॉलर, ५०० युरोज व भारतीय चलनातील १३ हजार रुपये, पाच मोबाइल, केमिकल, काळे कागद, लॉकर असे साहित्य जप्त केल्याची माहिती आज पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे.
इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिक अभिजित हंबीरराव खराडे (वय २९) यांना काही दिवसांपूर्वी एका परदेशी नागरिकाने फोन केला.

आपल्याला २० मिलियन युरोज व्यवसायात गुंतवायचे आहेत. आपल्याला स्विस बॅंकेकडून काळ्या रंगाचे कागदी डॉलर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. पण चलन सुरक्षितता म्हणून चलन काळे करून दिले आहेत. चलनातून भारतीय चलनाची दुप्पट रक्कम देऊ, असे सांगत त्याने ६३ लाख रुपये दिल्यास त्याचा परतावा म्हणून ३ कोटी २० लाख रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवले. पैसे देण्याची कबुली दिल्यानंतर इसाह याने खराडे यांना इचलकरंजी येथे जाऊन त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. इसाह हा हातचलाखी करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिस अधीक्षक देशमुख यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस तपास करण्याचे आदेश दिले.

संशयित इसाह हा कोल्हापुरातील कोहिनूर हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमध्ये सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे १३ हजार २५० रुपयांच्या भारतीय नोटा, २०० अमेरिकन डॉलर, ५०० युरोज (नोटांच्या आकारातील), काळ्या कागदांचे बंडल, केमिकल्स, हातमोजे, कापूस, मास्क, आदी साहित्य जप्त केले. त्याच्याकडील साहित्याच्या माध्यमातून आठ कोटी ४० लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक होऊ शकली असती, अशी माहिती पोलिस अधीक्षक देशमुख यांनी दिली.

पोलिसांनी संशयित इसाहच्या हातचलाखीचे प्रात्यक्षिक करून घेत त्याचे चित्रीकरण केले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिस निरीक्षक तानजी सावंत, सहायक फौजदार नेताजी डोंगरे, संजय पडवळ, अजय काळे, विलास किरोळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पत्रकार परिषदेसाठी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले आदी उपस्थित होते.

संपर्क साधण्याचे आवाहन
अटक केलेला मुथाय इसाह एक महिन्यापासून भारतात आहे. चार दिवसांपूर्वी तो कोल्हापुरात आला आहे. त्याच्याकडे पैसे देऊ शकतील, अशा संभाव्य व्यापाऱ्यांची यादी मिळून आली आहे. त्यामुळे त्याने यातील काहींशी संपर्क साधला असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याने अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Keniyan citizen arrested in Fraud currency