आपलं केरळ संकटातून पुन्हा उभं राहील...

अजित झळके
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सांगली - कृष्णामाईला २००५ मध्ये आलेल्या पुराच्या कैकपट पाणी केरळमध्ये आमच्या गावात घुसलं होतं... तासाला एकेक फुटानं वाढतं होतं... बाहेर पडायला अवधी मिळत नव्हता... बारा जिल्ह्यातील हजारो संसार पोटात घेऊन महाप्रलयकारी पुराने थैमान घातलं... आता पाणी मागे सरकलं आहे. लोक वाचलेत, हेच महत्त्वाचं. आता नवनिर्माणाची वेळ आहे.

आम्हाला खात्री आहे, आपलं केरळ पुन्हा उभं राहील. समस्त भारतीय आणि जगभातील मानवतावादी लोकांच्या मदतीनं... नम्मलीलुडे केरळम्‌ अधिजीवीकम्‌..!

केरळा समाज संघटनेचे अध्यक्ष टी. जी. सुरेश कुमार आणि सचिव पी. विजयन्‌ ‘सकाळ’शी बोलताना भावनिक झाले होते. सुरेशकुमार प्रत्यक्ष पुराशी झुंज देऊन दोन दिवसांपूर्वी सांगलीला परतले. सांगली-मिरजेसह जिल्ह्यात केरळमधून व्यवसायाच्या निमित्ताने साडेतीनशे कुटुंबं आली आहेत. नातेवाईक देवभूमीत, निसर्गाच्या सानिध्यात आनंदात जगत होते. वर्षातून एक-दोनदा हे लोक तिकडं जायचे. यावेळी एक वाईट बातमी येऊन धडकली आणि सारे सुन्न झाले. देवभूमी पाण्यात गेली, ज्या घरांत हे लोक वाढले ती घरं पाण्याखाली गेली. संसार उद्‌ध्वस्त झाले. त्यांच्यासाठी निधी संकलनाचे काम इथे सुरू झालेय. प्रत्यक्ष केरळमध्ये प्रलयकारी पुराचा सामना करून परतलेले सुरेशकुमार सांगत होते, ‘‘सांगलीत कृष्णेचा महापूर पाहिला, इथे पाणी किती वाढणार, हे कळायचं. केरळमध्ये अंदाजच येत नव्हता. खूप गतीने पाणी वाढेल. पाण्याचा वेग प्रचंड. शंभर वर्षांत असला प्रकार नव्हता. घरे पाण्यात गेली, गावात उंच जागा राहिल्या नाहीत. जेथे शक्‍य तेथे आम्हा लोकांना घेऊन गेले. लष्कर, नौदल, हवाई दलाचे प्रयत्न होते, मात्र स्थानिक मासेमारी करणाऱ्यांनी तब्बल २३०० नौका महापुरात आणल्या. खऱ्या अर्थाने मृत्यू टाळण्यास तो प्रयत्न कामी आला. लोकांना सुरक्षित बाहेर काढले गेले.’’ 

पी. विजयन्‌ म्हणाले, ‘‘आमचे खूप सारे नातेवाईक पूरग्रस्त आहेत. पात्रंदिता जिल्ह्यातील राण्णी भागात ते सुरक्षित आहेत. आम्हाला मदतीसाठी जायचे आहे, मात्र आता तशी स्थिती नाही. येथून आर्थिक मदत उभी करतोय, आम्ही मदतकार्यात सहभागी होऊन केरळ उभारणीचे काम करू.’

अडीच लाखांची मदत
सांगलीतील केरळी बांधवांनी गेल्या चार दिवसांत केरळ पुनर्निर्माणासाठी अडीच लाख रुपयांची मदत उभी केली आहे. ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवली जाणार आहे. त्यात आणखी मदतीचा ओघ सुरू आहे. देशभरातून अन्न, कपडे मिळत आहेत, आता खरी गरज पैशांची असल्याचे सुरेशकुमार यांनी सांगितले. सांगलीकरांनीही खूप मोठी मदत केरळला पाठवल्याबद्दलही त्यांनी आभार मानले.

Web Title: Keral Flood Disaster