केरळसाठी सोशल मीडियाद्वारे मदतीचा हात

कोल्हापूर - जमा झालेल्या साहित्यासह उडान फौंडेशनच्या महिला सदस्य आणि संस्थापक भूषण लाड.
कोल्हापूर - जमा झालेल्या साहित्यासह उडान फौंडेशनच्या महिला सदस्य आणि संस्थापक भूषण लाड.

कोल्हापूर - पुराने केरळ उद्‌ध्वस्त झाले, किती भयानक आहे, बापरे काय करत असतील येथील लोक? बिचारे... अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाठवून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्यांची कमी नाही. मात्र याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार झालेला महिलांचा उडान फाैंडेशन ग्रुप त्याला अपवाद ठरला आहे. फेसबुक, व्हॉटस्‌ ॲपच्या माध्यमातून महिला सदस्यांनी मदतीचे आवाहन केले आणि बघता बघता धान्य, कपड्यांसह नित्य उपयोगातील तीन टेम्पो इतके साहित्य जमा झाले. त्याची बांधाबांध करून केरळवासीयांना पाठविण्यात येत आहे. 

महाविद्यालयीन शिक्षण घेताना बाचणीतील भूषण शिवाजी लाड आणि त्याच्या मित्रपरिवाराला एक निराधार वयोवृद्धा भवानी मंडप परिसरात हातगाडीवर वडा मागून खाताना दिसायची. तिच्याकडे बघत आपण या घटकासाठी काहीतरी करायला हवं, असे त्यांना वाटू लागले. भूषणने त्याचा वाढदिवस त्या आजीसोबत साजरा केला. तिला केक भरवल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते. मराठा क्रांती मोर्चानिमित्त भूषणही स्वयंसेवक होता. त्याचबरोबर महिला स्वयंसेविकांचे १३ ग्रुप कार्यरत होते. या ग्रुपच्या माध्यमातून आणखी सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी उडान फाैंडेशनची स्थापना केली. फेसबुक आणि व्हॉटस्‌ ॲपच्या माध्यमातून १९५ महिला या ग्रुपमध्ये एकत्रित आल्या. चर्चा, गप्पा-टप्पा, पार्टीचे नियोजन याला छेद देत या ग्रुपने सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यास पसंती दिली. सोशल मीडियाच्या मदतीने आतापर्यंत ५१ निराधार लोकांचे पुनर्वसन, घरातून निघून गेलेल्या २२ वयोवृद्धांना पुन्हा घरी पोचविण्याचे काम या फाैंडेशनने केले आहे. पुरामुळे केरळ उद्‌ध्वस्त झाले आहे. तेथील बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी फाैंडेशनने पुढाकार घेतला.

ग्रुपचे सस्थांपक भूषणसह सक्रिय सदस्या अनिता घाटगे, सोनाली रजपूत, माधुरी जाधव, मानसी शेटे, प्राजक्ता चव्हाण, मनीषा घाटगे, अफरिन नायकवडी, ललिता गांधी, रेखा उगवे आदींनी सोशल मीडियावर मदतीसाठीचे आवाहन केले. बघता बघता तब्बल तीन टेम्पो मदत संकलित झाली. ८०० किलो धान्य, दोन टेंपो कपडे, २३ बिस्किट पुड्याच्या बॉक्‍सह सॅनिटरी नॅपकीन, साबण, टूथ पेस्ट आदी साहित्य राजारामपुरीत राहणाऱ्या अनिता घाटगे यांच्या घरी महिला सदस्य वेळ मिळेल तसे वर्गीकरण करू लागल्या आहेत. ही मदत व्हाईट आर्मीच्या सहकार्यातून केरळवासियांपर्यंत उद्या (ता. २४) पोचविण्यात येणार आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांची ओळख नसतानाही १९५ महिला सदस्य उडान फाैंडेशनशी जोडल्या गेल्या आहेत. समाजातील गरजू, निराधार आणि उपेक्षित घटकांना उपयोगी कसे पडू हा आमच्या ग्रुपचा ध्यास आहे. 
- अनिता घाटगे, सदस्या, उडान फौंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com