आषाढीच्या तोंडावर केरोसीन विक्रेत्यांचे राजीनामा अस्त्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

पंढरपूर - ऐन आषाढी यात्रेच्या तोंडावर तहसीलदारांनी मागण्यांसंदर्भात चर्चा न करता कारवाई करण्याचा इशारा दिल्याने शहरातील सर्व 50 केरोसीन विक्रेत्यांनी आज नायब तहसीलदारांना भेटून सामूहिक राजीनामा पत्र सादर केले. यासंदर्भात तातडीने तोडगा न निघाल्यास आषाढी यात्रेत वारकऱ्यांना रॉकेलसाठी फिरावे लागणार आहे.

यासंदर्भात रॉकेलविक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ""पंढरपूर शहरातील बिगर गॅसधारकांचा सर्व्हे 1996 पासून केलेला नाही. शहरातील बोगस कार्ड शोधले; परंतु संबंधितांचे गॅसकनेक्‍शन कमी केले नाही. ग्रामीण भागातील शिधापत्रिका धारकांकडे गॅस आहे. परंतु शहरातील रॉकेलचा कोटा कमी करून ग्रामीण भागाला दिला. गॅसधारक कमी केले नाहीत. जानेवारी 2015 पासून मंत्र्यांसह सर्वांना मागण्यांची निवेदने दिली; प्रत्यक्ष भेटी घेतल्या, परंतु तरीही आमच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. रॉकेल विक्रेत्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने नाइलाजास्तव आम्हाला आषाढी यात्रेत रॉकेल विक्री करणार नाही, असा लेखी इशारा द्यावा लागला होता. परंतु त्यावर चर्चेतून मार्ग काढण्याऐवजी तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, पुरवठा अधिकारी यांनी कारवाईची भाषा केल्याने शहरातील आम्ही 50 केरोसीन विक्रेत्यांनी सामुदायिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असून हे निवेदन हेच सामूहिक राजीनामे समजावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर रॉकेलविक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार देशपांडे व अध्यक्ष अप्पा कोकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: kerosene vendor in pandharpur