खानापूर युवा सेनाध्यक्षाचा खून

खानापूर युवा सेनाध्यक्षाचा खून

खानापूर - प्रेम प्रकरणातून झालेल्या भांडणात मध्यस्थीसाठी गेलेल्या खानापूर तालुका युवा शिवसेनेचा अध्यक्ष आकाश शशिकांत भगत (वय २१ रा. खानापूर) याचा जाधववाडी येथे खून झाला. काल रात्री साडेनऊच्या सुमारास भर चौकात हा प्रकार घडला. संशयित आदिनाथ दिलीप भोसले (वय २१, रा. जाधववाडी) याने केलेल्या चाकूच्या वारामुळे भगत यांचा साथीदार विपुल जाधवही गंभीर जखमी झाला.  संशयितासह वडील व लहान भाऊ अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रमोद विठ्ठल कदम (वय २२, रा. भूड) याने खानापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी कदम व संशयित आदिनाथ यांच्यात प्रेम प्रकरणावरून वाद झाला होता. तो मिटविण्यासाठी संशयित आदिनाथने प्रमोदला फोन करून जाधववाडीत बोलवले होते. त्यावेळी प्रमोदने मित्र व खानापूर तालुका युवा शिवसेनेचा तालुकाध्यक्ष आकाश भगत, विपुल जाधव व अन्य दोघांना सोबत घेऊन जाधववाडीस गेला. गावातील हनुमान मंदिराजवळ मुख्य चौकात सर्वांची भेट झाली. वाद वाढतच गेला. बाचाबाचीत आदिनाथने अचानकपणे विपुल जाधव याच्यावर चाकू हल्ला केला.

त्याने वार चुकवला मात्र डाव्या बरगडीवर व हातावर वर्मी घाव बसले. बाचाबाची सुरू असताना आकाशने आदिनाथला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने उलट आकाशवर हल्ला करीत त्याच्या छातीवर वर्मी घाव घातले. तो जागीच कोसळला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाला. आकाशला जखमी विपुल जाधव यानेच मोटारसायकलवरून खानापूर येथे आणले. यानंतर विटा येथील खासगी रुग्णालयात अतिरक्तस्रावाने आकाशचा मृत्यू झाला.

ही घटना रात्रीच सोशल मीडियावरून पंचक्रोशीत  व्हायरल झाली. खानापूर पोलिसांनी संशयित आदिनाथचे वडील दिलीप किसन भोसले (वय ५५, रा. जाधववाडी) यांना ताब्यात घेतले. आकाशचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी सांगलीत नेले.

संशयितांच्या अटकेसाठी कडक कारवाई करावी यासाठी खानापूर पोलिस दूर क्षेत्राच्या आवारात युवकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ यांनी जमावापुढे येत संशयितांवर कठोर कारवाईची हमी दिल्यानंतर लोक शांत झाले.

दरम्यान, आज दुपारी आकाश भगत याच्या पार्थिवावर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. संशयित आदिनाथला विटा न्यायालयात हजर केले असता (ता.२१) पर्यंत पोलिस कोठडी मिळाली. पोलिस निरीक्षक नानासाहेब सावंत तपास करीत आहेत.

संशयित सापडला विहिरीत
पोलिसांनी रात्रीच खुनी संशयित आदिनाथचे मोबाईल लोकेशन तपासले. असता तो जाधववाडी, ढोराळे हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रात्रीच शोधमोहीम राबवली असता जाधववाडीच्या डोंगरात संशयित रात्रभर लपून बसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता तो पळता पळता शिवारातील एका पडक्‍या विहिरीत पडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले.  प्रदीप पाटील, अनिल जाधव, संतोष घाडगे, सुहास खुबीकर, रवी धारवड, महेश खिलारे, अमर सूर्यवंशी, अमोल लोहार, हणमंत शिंदे आदींसह सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम नागराळे, उदय साळुंखे यांनी रात्रीत कारवाई करीत संशयिताला गजाआड केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com