खंडाळ्याला हवा कायम ‘मुख्याधिकारी’!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

खंडाळा - नगरपंचायत नव्याने स्थापन झाल्यापासून कायमस्वरूपी  मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायतीचे कामकाज विस्कळित सुरू आहे. विविध विकासकामांना आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करणे, नागरिकांना दैनंदिन विविध नोंदींसह विविध दाखल्यांसाठी तासन्‌तास ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. त्याला नगराध्यक्ष शरदकुमार दोशी यांनी दुजोरा देत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्याची मागणी केली आहे.  

खंडाळा - नगरपंचायत नव्याने स्थापन झाल्यापासून कायमस्वरूपी  मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायतीचे कामकाज विस्कळित सुरू आहे. विविध विकासकामांना आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करणे, नागरिकांना दैनंदिन विविध नोंदींसह विविध दाखल्यांसाठी तासन्‌तास ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. त्याला नगराध्यक्ष शरदकुमार दोशी यांनी दुजोरा देत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्याची मागणी केली आहे.  

राज्य शासनाच्या धोरणानुसार तालुका क्षेत्र म्हणून २७ डिसेंबर २०१६ रोजी खंडाळा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. मुख्याधिकारीपदी निखिल जाधव रुजू झाले. मात्र, सुरवातीचा काही कालावधी गेल्यानंतर श्री. जाधव हे दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत. त्यानंतरही वारंवार रजेवर गेल्यामुळे अखेर मुख्याधिकारापदाचा अतिरिक्त कार्यभार वाई पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे देण्यात आला. मात्र, त्यांची वाई पालिका व खंडाळा नगरपंचायतीचा कार्यभार सांभाळताना कसरत होत आहे. 

खंडाळा नगरपंचायतीत २९ कर्मचारी मंजूर असताना सध्या ११ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात इंजिनिअर, आर्किटेक्‍ट, लॅब असिस्टंट, अकाउंटंट व इतर पदे अद्यापही भरली गेली नसल्यामुळे संबंधित विभागाचे कामकाज करताना अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शासनाने नगरपंचायतीमध्ये या पदांची भरती करावी, अशी मागणी उपाध्यक्ष दयानंद खंडागळे यांनी केली आहे.

नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून अनेक विकासकामे करण्यात आली. त्यात ओढासफाई, विजेचे बल्ब बसविणे आदी कामे झाली असली, तरी  कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे नगरपंचायतीसाठी नवीन नळ पाणीपुरवठा योजना, अंतर्गत भूमिगत गटार योजना, अंतर्गत सिमेंट काँक्रिटचे रस्ते, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्त शहर आदी प्रमुख योजना राबवण्यात कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे अडचण येत आहे.

कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होतात. नगरविकास विभागाने तातडीने कायम मुख्याधिकारी द्यावा. त्यासाठी आम्ही आमदार मकरंद पाटील यांच्यामार्फत प्रयत्नशील आहोत.
- शरदकुमार दोशी, नगराध्यक्ष, खंडाळा नगरपंचायत

खंडाळा नगरपंचायतीचा कार्यभार प्रसाद काटकर यांच्याकडे कायमस्वरूपी द्यावा. नगरपंचायतीमधील अपुरा कर्मचारीवर्ग भरण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
- दयानंद खंडागळे, उपाध्यक्ष, खंडाळा नगरपंचायत

खंडाळा नगरपंचायत झाल्यापासून मुख्याधिकारी हे दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. तात्पुरती मलमपट्टी म्हणून वाईकडे ‘चार्ज’ दिलेला आहे. मात्र, सत्ताधारी गटाने प्रयत्न करून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा.
- प्रल्हाद खंडागळे, उपनेता, विरोधी पक्ष, खंडाळा नगरपंचायत

Web Title: khandala satara news permanent officer demand