खटाव-माणमध्ये विधानसभेची रंगीत तालीम

NCP-&-BJP
NCP-&-BJP

वडूज - खटाव-माण तालुक्‍यांत गेल्या काही दिवसांत झालेल्या कार्यक्रमांतून आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. भाजपतर्फे टेंभू योजनेच्या कामाचे भूमिपूजन, ‘राष्ट्रवादी’ने माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा साजरा केलेला वाढदिवस व काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी माण तालुक्‍यात उरमोडीतून आलेल्या पाण्याचे केलेले जलपूजन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.

खटाव-माण विधानसभा मतदारसंघ गेली दहा वर्षे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आमदार गोरे यांचा पाडाव करण्यासाठी आता भाजप, राष्ट्रवादी सरसावली आहे. भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी २००४ मधील विधानसभेच्या निवडणुकीत चांगली मते मिळवलेली होती. त्यामुळे हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ‘विनिंग सिट’ म्हणून रडारवर आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे गेल्या काही महिन्यांत तालुक्‍यात दौरे वाढले आहेत. त्यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यासह अनेक आमदार, खासदार व महामंडळांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत डॉ. येळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी टेंभू योजनेमधून मायणी तलावासह माण तालुक्‍यातील १६ गावांना पाणी देण्याचा कार्यक्रम घेतला.

म्हसवड व मायणी येथील जाहीर सभांतून भाजपने शक्तिप्रदर्शन केले. खटाव-माणमधील भाजपची ताकद लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याला ताकदीने निवडून आणण्याचा डॉ. येळगावकर, देसाई यांनी मंत्र्यांच्या साक्षीने जाहीर शब्द दिला आहे. त्यामुळे भाजपने विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने आपली रणनीती सुरू केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अद्याप निश्‍चित नसली तरी राष्ट्रवादीनेही दोन्ही तालुक्‍यांत मोर्चेबांधणी कायम ठेवली आहे.

त्यादृष्टीने माजी आमदार घार्गे यांनी पडळ येथे साखर कारखान्याची उभारणी करून तालुक्‍याचा विकासात्मक कायापालट घडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दाखवून दिले आहे. श्री. घार्गे यांनी विधान परिषदेतही काम केले आहे. मात्र, घार्गे यांना थेट जनतेतून आमदार करून विधानसभेत पाठविण्याचे घार्गे यांच्या समर्थकांचे स्वप्न आहे. त्यामुळे समर्थकांनी नुकताच घार्गे यांचा वाढदिवस जल्लोषी साजरा करून हे स्वप्न सत्यात उतरविण्याची डरकाळी फोडली आहे. आमदार गोरे यांचा उरमोडी योजनेतून माण तालुक्‍यामध्ये आलेल्या पाण्याच्या पूजनाचा कार्यक्रम झाला. मंत्री पाटील यांच्या दौऱ्याअगोदर झालेला हा कार्यक्रम राजकारणाच्या पटलावर प्रतिस्पर्ध्यांना ‘चेक’ देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. हरणाई सूतगिरणीचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी माणदेशी सूतगिरणीवर पत्रकार परिषद घेऊन विजयादशमीच्या मुहूर्तावर माण शुगर ग्रीड मिल या खासगी साखर कारखान्याचे भूमिपूजन करणार असल्याचे सांगितले.

त्यामुळे यानिमित्ताने आगामी काळात त्यांचे राजकारण पुन्हा उभारी घेऊ शकते. कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांत जलसंधारण कामांना भेटी देणे, श्रमदान करून ग्रामस्थांचा उत्साह वाढविणे, विविध शिबिरे, फळझाडांचे वाटप करून आपली मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. तर शेखर गोरे यांच्या वतीने त्यांच्या भगिनी सुरेखा पखाले यांनी संपर्क कायम ठेवला आहे. 

खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांची सभापतिपदाच्या कालावधीमध्ये झालेली कामे सर्वसामान्यांना भावली आहेत. त्यामुळे विधानसभेच्या आखाड्यामध्ये ऐनवेळी सभापती मांडवे यांना किस्ताक बांधावे लागण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही.

नागरिकांत मात्र जोरदार चर्चा !
आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने सध्या खटाव-माणमध्ये राजकारणाच्यादुष्टीने विविध पक्षांच्या वतीने सुरू असलेल्या या कार्यक्रमांच्या धुमाकूळाची नागरिकांत मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com