खिद्रापूरचं शिल्पवैभव अजून पुराच्या गाळाखाली...

संजय खूळ
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

स्वच्छतेसाठी अजून पंधरवडा...
विविध संस्थांच्या माध्यमातून आणि गावकर्‍यांच्या सहकार्याने मंदिर परिसराची स्वच्छता झाली आहे. मात्र, मंदिराची पूर्ण स्वच्छता होण्यास किमान 15 दिवस लागणार आहेत.
- उमेश गुरव, खिद्रापूर

इचलकरंजी : शेकडो पावसाळे पाहिलेले शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर अर्थात ऐतिहासिक कोपेश्‍वर मंदिर तब्बल 12 दिवस पाण्याखाली होते. पुराचे पाणी आता ओसरले असले तरी, शिल्पसौंदर्याने नटलेल्या या मंदिराची पूर्ण स्वच्छता होण्यासाठी तब्बल दोन आठवड्यांहून अधिक काळ लागणार आहे. मंदिर खुले झाले असले तरी अनेक ठिकाणी, कोरलेल्या मूर्तींवर अद्यापही मातीचा थर कायम आहे. मंदिराचा विद्युत पुरवठा खंडीत असल्याने स्वच्छता करण्यास अडथळा येत आहे.

महापुराने खिद्रापूरलाही प्रचंड वेढा घातला होता. ऐतिहासिक आणि वास्तु कलेचा अद्भूत नमुना म्हणून खिद्रापूरच्या कोपेश्‍वर मंदिराची ख्याती आहे. देशातील अनेक भागातून हे मंदिर पाहण्यासाठी नागरिक येत असतात. दोन आठवड्यापूर्वी आलेल्या महापुराचा या मंदिराला बघता बघता वेढा बसला होता. सुमारे 12 दिवस या मंदिरात पाणी होते. हे मंदिर नदीकाठी वसलेले असल्याने मोठ्या प्रमाणात माती आणि कचरा पुराबरोबर या ठिकाणी आला होता. तीन दिवसापूर्वी या ठिकाणचे पाणी ओसरले आणि त्यानंतर स्वच्छतेला सुरुवात झाली.

राज्यातील अनेक भागांतून स्वच्छता पथके शिरोळ तालुक्यात येत आहेत. मुंबई येथील एक पथक या ठिकाणी आले होते. त्यांनी स्थानिक तरूण, पुजारी यांच्यासोबत या ठिकाणी स्वच्छता केली. मात्र, पाणी आणि वीज पुरवठ्याअभावी अजून हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. मंदिराच्या परिसरात अजून गाळ साचून राहिलेला आहे. याशिवाय पाणी जेवढ्या उंचीपर्यंत गेले त्या उंचीवर अजून स्वच्छता होऊ शकलेली नाही. परिणामी या मंदिरावरील बरेचसे शिल्पवैभव अद्यापही मातीच्या थराआडच आहे. 

सध्या मंदिराचा वीज पुरवठा तात्काळ सुरू करणे अशक्य आहे. कारण अद्यापही अनेक भागांत पाण्याची ओल कायम आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव या ठिकाणचा वीज पुरवठा सुरू केला नसल्याने कुपनलिकाही बंद आहेत. त्यामुळे स्वच्छतेत अडथळे येत आहेत. अजूनही बाहेरून स्वच्छता करणारे कार्यकर्ते खिद्रापुरात येत आहेत. आपापल्या परीने स्वच्छता करत आहेत.

स्वच्छतेसाठी अजून पंधरवडा...
विविध संस्थांच्या माध्यमातून आणि गावकर्‍यांच्या सहकार्याने मंदिर परिसराची स्वच्छता झाली आहे. मात्र, मंदिराची पूर्ण स्वच्छता होण्यास किमान 15 दिवस लागणार आहेत.
- उमेश गुरव, खिद्रापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khidrapu Temple affected by flood

टॅग्स