सोशल साइटच्या भिंतीवरही ओघळले अश्रू

सोशल साइटच्या भिंतीवरही ओघळले अश्रू

खिद्रापुरेच्या क्रूर कर्मांचा निषेध - ‘लेक वाचवा, देश वाचवा’चा संदेश 

सांगली - किती तरी कळ्या उमलण्याआधी गाडल्या गेल्या, या प्रश्‍नांनी अनेकांची डोकी सुन्न  झालीत. म्हैसाळच्या खिद्रापुरे डॉक्‍टरच्या कारनाम्यामुळे नेटीझन्स्‌च्या पोटात दुःखाचा खड्डा पडलाय. घटनेनंतर फेसबुक, वॉटस्‌अप, ट्विटरसारख्या सोशल साइटवर  तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. गेल्या चार दिवसांपासून सोशल साइटच्या भिंतीवर ओघळलेले अश्रूच दिसत आहे. निषेध व्यक्त करत ‘लेक वाचवा, देश वाचवा’चा संदेशही नेटीझन्स्‌कडून दिला जात आहे. 

म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब  खिद्रापुरेच्या हॉस्पिटलरुपी कसाईखाना साऱ्यांसमोर आला. काहूर माजवणाऱ्या या घटनेने राज्याला हादरून सोडले. त्यानंतर विविध खात्यांचे मंत्री, सामाजिक संघटना, माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या मॅरेथॉन भेटी सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला फेसबुक, वॉटस्‌अप, ट्विटर सारख्या आभासी जगातही ही घटना प्रखरपणे दाखवली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून नेटीझन्स्‌ सुन्न आहेत. कारण आजच्या टेक्‍नोसॅव्ही म्हणा किंवा एकविसाव्या जगात अशी घटना घडते, याचं आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. एका बाजूला सरकार ‘लेक वाचवा’चा टिमक्‍या वाजवते आहे, तर दुसऱ्या बाजूला अशा घटना घडताहेत. 

यावर नेटीझन्स्‌ सरकारचाही खिस पाडताना दिसताहेत. अनेक ‘कल्याणकारी’ योजनांची तर खिल्ली उडवली जात आहे. ‘अब की बार’चा नारा देत अनेक नेटीझन्स्‌चा उद्वेग व्यक्त होताना दिसतोय. मंत्र्यांच्या धावत्या दौऱ्यांची सरकारला याची गंभीरता कितपत वाटते, याविषयी टीकात्मक चारोळ्या शेअर केल्या जात आहेत. त्याचबरोबर ‘लेक वाचवा’चा संदेश देणारे शेकडो फोटो एकमेकांच्या ग्रुपवर शेअर केले  जात आहेत. तर अनेक लेख, चारोळ्यांचाही संदर्भ जोडला जात आहे. 

शिक्षण, नोकरीनिमित्त परगावी असणाऱ्यांना ही बातमी समजल्यानंतर अक्षरशः द्वेष व्यक्त केला जात आहे. परदेशात असणारे भारतीय नेटीझन्स्‌ही मुलींच्या संरक्षणाविषयीच्या तिथल्या संकल्पना शेअर करताना दिसत आहेत. खिद्रापुरेच्यामुळे हे प्रकरण उजेडात आले, असे अनेक डॉक्‍टर समाजात आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का? संबंधित यंत्रणा याची जबाबदारी स्वीकारणार का? असे सवालही उपस्थित करून नेटीझन्स्‌ची मते जाणून घेतली जात आहेत. एकंदरीतच फेसबुक, वॉट्‌सअप, ट्‌विटर सारख्या सोशल साईटच्या भिंतीवर दुःखाचे अश्रू ओघळताहेत.

मुख्यमंत्री दखल घेणार का?
एरव्ही विविध इव्हेंट, निवडणुकीच्या विजयाचे अपडेट शेअर करणाऱ्या टेक्‍नोसॅव्ही मुख्यमंत्र्यांनाही ही घटना ट्विटरवरून अनेकांनी शेअर केली. या घटनेची तितक्‍या गंभीरतेने मुख्यमंत्री दखल घेणार का, असा सवालही उपस्थित होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com