...अपहरण झालेलाच निघाला चाेर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

शाहुपूरी पोलिसांच्या एका तपासामुळे दोन गुन्हे उघडकीस येण्यास मदत झाली आहे. 

 
सातारा : शाहुपूरी पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार आलेला अल्पवयीन मुलगा एका चोरीतील संशयीत निघाला आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
 
करंजे परिसरातील महानुभाव मठासमोरील स्वस्तीक ट्रेडर्स या दुकानामध्ये गुरूवारी (ता. 7) चोरी झाली होती. या मध्ये चोरट्यांनी 16 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची तक्रार दुकानाचे मालक जयंतीलाल राऊजी पटेल यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात दिली होती.

अल्पवयीन मुलाचा चोरीत समावेश

या चोरीच्या तपासासाठी सहायक पोलिस अधिक्षक समिर शेख यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुगुटराव पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक विशाल वायकर यांना सुचना दिल्या होत्या. तसेच गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सिसिटीव्ही फुटेजची तपासणी तसेच खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलाचा चोरीत समावेश असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिस पथक संबंधीत मुलाचा शोध घेत होते.

पालकांनी नाेंदवली अपहरणाची तक्रार

दरम्यानच्या काळात संबंधीत मुलाच्या पालकांनी त्याचे अपहरण झाल्याची तक्रार शाहुपूरी पोलिस ठाण्यात दिली. त्यामुळे गुन्ह्याचे गांभिर्य वाढले होते. पोलिस संबंधीत मुलाचा कसून शोध घेत होते.

म्हणून मी घाबरून पळून गेलो

दरम्यान काल तो मुलगा शहरातील एका परिसरात आल्याची माहिती शाहुपूरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे पथकातील हवालदार हसन तडवी व लैलैश फडतरे यांनी त्या मुलाचा शोध घेतला. तसेच पालकांच्या समक्ष त्याला ताब्यात घेतले. त्या वेळी त्याने आपले अपहरण झालेच नव्हते अशी माहिती पोलिसांना दिली. तसेच चोरीमध्ये माझा हात असल्याची माहिती बाहेर पडल्यामुळे घाबरून मी पळून गेलो होते असेही त्याने पोलिसांना सांगितले.

युवकांच्या साथीने चोरी केल्याची दिली कबूली

त्याचबरोबर स्वस्तीक ट्रेडर्समध्ये दोन युवकांच्या साथीने चोरी केल्याची कबूलीही त्याने दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी संतोष नारायण चव्हाण (वय 20) व अजय भानुदास देशमुख (वय 20, दोघे रा. मतकर कॉलनी झोपडपट्टी) यांना अटक केली.

त्यांच्याकडून चोरी गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक भोसले, हवालदार हिम्मत दबडे - पाटील, हसन तडवी, शंकर गायकवाड, लैलेश फडतरे, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार हे सहभागी होते. हवालदार शंकर गायकवाड तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ...Kidnapped Kid Found As Thief