(व्हिडिओ) उद्योजक हुंडेकरी यांना अपहरणर्त्यांनी इथे सोडले... 

सूर्यकांत वरकड 
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

करीमभाई हुंडेकरी आज पहाटे नमाजपठणासाठी जात होते. ते सर्जेपुरा परिसरातील बेलदार गल्ली येथील शाळेजवळ आले असता, पाठीमागून एक मोटार येऊन त्यांच्याजवळ थांबली. त्यातून चार जण उतरले आणि करीमभाईंच्या डोक्‍याला पिस्तूल लावले. काही कळायच्या आत त्यांनी करीमभाईंना मोटारीत बसवून अपहरण केले.

नगर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटे गुंडांनी अपहरण केले होते. मात्र अपहरणकर्त्यांनी त्यांना नगरपासून सुमारे पावणेदोनशे किलोमीटर अंतरावर मोठ्या शहराजवळ नेऊन सोडून दिले. अपहरणकर्ते मात्र पसार झाले आहेत. 

डोक्‍याला पिस्तूल लावून अपहरण 
करीमभाई हुंडेकरी आज पहाटे नमाजपठणासाठी जात होते. ते सर्जेपुरा परिसरातील बेलदार गल्ली येथील शाळेजवळ आले असता, पाठीमागून एक मोटार येऊन त्यांच्याजवळ थांबली. त्यातून चार जण उतरले आणि करीमभाईंच्या डोक्‍याला पिस्तूल लावले. काही कळायच्या आत त्यांनी करीमभाईंना मोटारीत बसवून अपहरण केले. हुंडेकरी उद्योजक समूहाचे सर्वेसर्वा असलेले करीमभाई दररोज पहाटे एसटी कॉलनीजवळील मशिदीमध्ये नमाजपठणासाठी जातात. आज पहाटे नेहमीप्रमाणे ते नमाजपठण करण्यासाठी सर्जेपुरा येथील बेलदार गल्लीतून निघाले होते. महापालिकेच्या शाळेजवळून जात असताना पाठीमागून अचानक एक कार आली. मोटारीतून चौघे खाली उतरले. त्यांच्या चेहऱ्याला मास्क बांधलेले होते. त्यांनी हुंडेकरी यांना मोटारीत ओढण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांची झटापट झाली. चौघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून हुंडेकरी यांना मोटारीत बसविले.

ही घटना परिसरातील एका महिलेने पाहिली. यावेळी आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिक जागे झाले. परंतु, तोपर्यंत ती मोटार कोठला स्थानकाच्या दिशेने निघून गेली. नंतर ती मोटरकार औरंगाबाद-पुणे रस्त्यावरून निघून गेली. काही लोकांनी मोटारीचा पाठलाग केला. परंतु कोठला परिसरातून मोटार वाऱ्याच्या वेगाने निघून गेली.

सीसीटीव्ही फुटेजवरून तपास 
हुंडेकरी यांच्या अपहरणाबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला. सर्वत्र नाकेबंदी करून तोफखाना, कोतवाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस तपासासाठी रवाना झाले. तोफखाना पोलिसांनी त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेच ताब्यात घेऊन तपासले. त्यात एक लाल रंगाची मोटर पोलिसांना जाताना दिसत आहे. परंतु, अस्पष्ट दिसत असल्याने ओळख पटविण्यात अडचणी आल्या. 
दरम्यानच्या काळात हुंडेकरी यांच्या अपहरणाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्यासाठी शहरात पसरली. करीमभाई यांच्या निकटवर्तीयांसह नजीकच्या उद्योजक आदींनी तत्काळ सर्जेपुरा भागात धाव घेतली. 

karimbhai hundekari

 

जालन्याजवळ करीमभाईंना सोडून दिले 
घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोध सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे करीमभाई जालना येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चार पथके करून जालन्याच्या दिशेने रवाना केली. मात्र, अपहरणकर्त्यांनी करीमभाई यांना जालन्याच्या बसस्थानकावरच सोडून दिले आणि ते पसार झाले. तेथून करीमभाई यांनी थेट एसटी बसमध्ये बसून नगरच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्या वेळी बसमध्ये शेजारी बसलेल्या तरुणाकडून मोबाईल घेऊन करीमभाईंनी आपल्या घरी फोन केला आणि एसटी बसने घरी येत असल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. 

पोलिसांकडून प्रत्येक एसटीची तपासणी 
करीमभाई एसटी बसने नगरकडे येत असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार आधीच जालन्याच्या दिशेने निघालेल्या पोलिस पथकाने नगर-औरंगाबाद रस्त्यावरील टोल नाक्‍यावर थांबून प्रत्येक एसटी बस तपासण्यास सुरवात केली. त्यात दुपारी तीन वाजता पुण्याला जाणाऱ्या एका बसमध्ये करीमभाई बसलेले आढळले. त्यांना उतरवून घेऊन पोलिसांच्या वाहनातून नगरला आणण्यात आले. हुंडेकरी यांनी ज्या तरुणाच्या मोबाईलवरून घरी संपर्क साधला, त्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याचा जबाब घेऊन सोडून दिले. दरम्यान, आरोपींच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्याची पथके रवाना झाली आहेत. करीमभाईं यांच्याकडून अपहरणकर्त्यांबाबत माहिती घेण्यात येत आहे. 

गुन्हेगारांचेच कृत्य 
उद्योजक करीम हुंडेकरी यांचे गेल्या अनेक दिवसांपासून उद्योजक क्षेत्रात मोठे नाव आहे. त्यांचे अपहरण नेमके कोणी आणि कशासाठी केले असावे? याचा शोध पोलिस करीत आहेत. मात्र, हुंडेकरी यांचे अपहरण गुन्हेगारी प्रवृत्तीच्याच लोकांनी केले असावे, असा अंदाजही वर्तवितण्यात येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The kidnapper were released by the hundekari here ...