किकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव

सुनील शेडगे
शनिवार, 19 जानेवारी 2019

नागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (ता. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना, पुरातत्त्वीय अन्‌ ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन शासनाने ते संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले आहे.

पुणे- बंगळूर महामार्गाच्या पूर्वेस वसलेले हे गाव. लोकसंख्या चार हजारांच्या घरात. गाव मुळातच शेतीसमृद्ध. आले, ऊस, हळदीच्या उत्पन्नात इथले शेतकरी अग्रेसर आहेत. गावात पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. 

येथील त्रिदल पद्धतीय रचना असलेले भैरवनाथाचे प्राचीन मंदिर हे गावची खरीखुरी ओळख. हेच या गावचे ग्रामदैवत. हेमाडपंथी स्थापत्यकलेचा आविष्कार ठरलेले हे मंदिर अप्रतिम आहे. त्यावर नक्षीकामाची रेलचेल आहे. मुखमंडपावरील छतावर वैविध्यपूर्ण झुंबरे कोरलेली दिसतात.

प्रवेशद्वारावरचे नक्षीकाम हा शिल्पकलेचा उत्तम नमुना मानला जातो. अश्विन महिन्यात भैरवनाथाचा यात्रोत्सव असतो.

मंदिराप्रमाणेच गावात मोठ्या संख्येने वीरगळी पाहावयास मिळतात. त्यामुळेच गावाला ‘वीरगळीचे गाव’ हे विशेषण लाभले आहे. अगदी सामान्य व्यक्तींपासून ते राजापर्यंत कित्येकांच्या सुस्थितीतील वीरगळी येथे पाहावयास मिळतात. वीरगळ म्हणजे युद्धामध्ये वीरमरण आल्यानंतर त्या सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभट दगडावर कोरून ठेवलेला युद्धप्रसंग.

वीरगळीप्रमाणेच युद्धामध्ये वीरमरण आलेल्या सैनिकांच्या पत्नी सती गेल्यानंतर त्यांच्या स्मृती अशाच प्रकारच्या दगडांवर कोरल्या आहेत. त्याची दखल शासनाने घेतली आहे. या वीरगळी नवव्या वा दहाव्या शतकातील असल्याचे संशोधक सांगतात.

जुन्या काळापासून हे गाव स्वयंपूर्ण खेडे म्हणून ओळखले जाते. गावात जुने वाडे मोठ्या प्रमाणात आहेत. अलीकडच्या काळात जुन्या वाड्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. गावात मध्यवर्ती ठिकाणी दोन मोठे पार आहेत. परिसरात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा अन्‌ हुतात्मा मुनाजी बाबर यांचा स्मृतिस्तंभ आहे. गावातूनच पुढे चंदन- वंदन किल्ल्याकडे जाणारी वाट आहे.

भाविकांसह संशोधकांची वर्दळ
भाविकांबरोबरच भैरवनाथाचे मंदिर पाहण्यासाठी, तिथल्या स्थापत्यकलेचा अभ्यास करण्यासाठी संशोधक, अभ्यासक गावास भेट देतात. या मंदिराच्या सभामंडपातील रंगशिळेवर चार भरजरी खांब असून, त्यावर संपूर्ण रामायण कोरलेले आहे. अशा प्रकारे रामायणाचे कोरीवकाम असलेले हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे.

Web Title: Kikali Village Historical Place