किरणोत्सव ठरतोय एक प्रयोगशाळा...! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिरात होणाऱ्या किरणोत्सवातील अडथळे दूर करण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अडथळे काढण्यात अपयश आले. तज्ज्ञांची समिती नेमली. समितीने अहवाल दिला. पण प्रशासनाकडून कुठलीच खमकी कारवाई होत नसल्याने त्यांची उदासनीता हाच आता किरणोत्सवातील मोठा अडथळा ठरतो आहे. किरणोत्सवाची पाहणी, अभ्यास ही केवळ प्रयोगशाळाच आहे काय, किरणोत्सव आला की त्याची चर्चा होते. बाकी वर्षभर प्रशासन काहीच का करीत नाही, असे संतप्त सवाल भाविकांतून व्यक्त होत आहेत. 

मंदिरात वर्षातून दोन वेळा किरणोत्सव होतो. 9, 10, 11 नोव्हेंबर आणि 31 जानेवारी, 1 व 2 फेब्रुवारीला सूर्याची मावळती किरणे थेट देवीच्या मूर्तीवर पडतात. किरणोत्सव सोहळा मंदिराच्या स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राचा उत्तम नमुना आहे; परंतु या किरणोत्सवाच्या मार्गावर बांधकामे झाल्याने गेल्या काही वर्षांत पूर्णपणे किरणोत्सव झालाच नाही. मंदिरातील किरणोत्सवात अडथळे येतात, त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला. त्यासाठी कोणता अडथळा किती प्रमाणात आहे, याचीही मांडणी करण्यात आली. ही मांडणी करून दहा वर्षे होत आली तरी अडथळा इंचानेही कमी झालेला नाही. अडथळा आहे तेथेच आणि किरणोत्सवही दरवर्षी त्यामध्ये अडकलेला, अशी स्थिती आहे. वास्तविक महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून तयार केलेला उत्सवच आहे. सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायनावेळी सूर्य मावळताना त्याची किरणे थेट मूर्तीवर येतात. हा अद्‌भुत सोहळा पाहण्यासाठी अनेक अभ्यासकही येतात; परंतु काही वर्षांपासून अडथळ्यांमुळे हा उत्सवच नीटपणे होऊ शकलेला नाही. आधीच इमारतींचा अडथळा आणि त्यात भर म्हणून हवेतील प्रदूषणाचा अडथळा तयार झाल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर. व्ही. भोसले यांनीच सुरवातीस किरणोत्सवामध्ये इमारतींचा अडथळा असल्याचे सांगितले होते आणि त्यांनी हवेच्या प्रदूषणाचाही मुद्दा मांडला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि देवस्थान समितीने किरणोत्सवामधील इमारती व हवेतील प्रदूषण असे दोन अडथळे दूर करण्यासाठी खमके प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 

आजपासून प्रारंभ 
किरणोत्सवाला बुधवार (ता. 9) पासून प्रारंभ होणार आहे. गेल्या दोन किरणोत्सवांचा अभ्यास करता गेल्या नोव्हेंबरमध्ये पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे काही सेकंदच किरणे आली. दुसऱ्या दिवशी चरणस्पर्श केला आणि तिसऱ्या दिवशी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोचली. जानेवारी-फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या किरणोत्सवात पहिल्या दिवशी चरणस्पर्श, दुसऱ्या दिवशी किरणे गायब आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा चरणस्पर्श अशी स्थिती राहिली. अर्थात गेले दोन्ही किरणोत्सव सोहळे अपूर्ण राहिले असून आता तरी किरणोत्सव पूर्ण होणार का, याची उत्सुकता आहे.

Web Title: Kiranotsava away obstacles in the Mahalaxmi Temple