"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे.

कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. "प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर यंदा हा महोत्सव होणार आहे.

पंचगंगा प्रदूषणाचे विदारक वास्तव डॉ. अनिल अवचट यांनी आपल्या लेखनीतून मांडल्याने पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या लढ्याला बळ मिळाले. त्यामुळे त्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होणार असल्याची माहिती आज "किर्लोस्कर'चे कृष्णा गावडे, उदय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

यंदाच्या महोत्सवात सांगलीतील अग्रणी नदीच्या पुनर्जीवनासाठी झटणारे राजेंद्र मदने यांचा वसुंधरा सन्मान पुरस्काराने गौरव होणार आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सक्रीय योगदान दिलेले प्रा. डॉ. पी. डी. राऊत, प्रा. डॉ. एस. डी. कदम, प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी यांचा वसुंधरा गौरव पुरस्काराने तर "सकाळ'चे छायाचित्रकार बी. डी. चेचर, फ्रेंडस्‌ नेचर क्‍लबचे तुषार साळगावकर, मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्‍लब (आंबोली) यांचा वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरव होणार आहे.

देशातील सहा राज्यातील 36 ठिकाणी हा महोत्सव होतो. येथे सलग नवव्या वर्षी हा महोत्सव होत असून लघुपट, चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रमांसह "वस्त्रोद्योग व नदी प्रदूषण', "नदी प्रदूषण रोखण्यासाठी तंत्रज्ञान' या विषयावर परिसंवाद, युवकांसाठी "नदी प्रदूषणाची कारणे आणि उपाय' या विषयावर युवा संसद, "प्रदूषण रोखा-नदी वाचवा' या विषयावर पोस्टर स्पर्धा, "रिव्हर अँड फन', हेरीटेज वॉक, अभ्यास सहलींसह व्याख्यानांचा समावेश असेल.

पत्रकार परिषदेला प्राचार्य अजय दळवी, राहूल पवार, अनिल चौगुले, विजय टिपुगडे, भाऊ सूर्यवंशी, अॅड. केदार मुनीश्‍वर, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर आदी उपस्थित होते.

दरम्यान, महोत्सवासाठी उद्या (ता.27) पासून सकाळी अकरा ते सात या वेळेत शाहू स्मारक भवनात व निसर्गमित्र (साईक्‍स एक्‍स्टेन्शन) येथे दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत नावनोंदणी सुरू होणार आहे. 

दृष्टीक्षेपात महोत्सव... 

  • एक ऑक्‍टोंबरला सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवनात उद्‌घाटन सोहळा. 
  • चार ऑक्‍टोंबरपर्यंत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम, पंधरा देसातील चाळीस लघुपट व अनुबोधपट 
  • दोन ऑक्‍टोंबरला सायंकाळी पाचला वसुंधरा गौरव व वसुंधरा मित्र पुरस्कारांचे वितरण 
  • चार ऑक्‍टोंबरला सायंकाळी पाचला वसुंधरा सन्मान पुरस्कार वितरण व सांगता सोहळा 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kirloskar Vasundhara film festival on River pollution issue