मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर किसान सभेचे ठिय्या आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

कोल्हापूर - कसणाऱ्यांच्या जमिनी काढून घेणार असाल तर तुमच्या हातून राज्य काढून घेऊ, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उदय नारकर यांनी दिला.

कोल्हापूर - कसणाऱ्यांच्या जमिनी काढून घेणार असाल तर तुमच्या हातून राज्य काढून घेऊ, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उदय नारकर यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेली सांगली ते कोल्हापूर शेतकऱ्यांची पायी दिंडी ताराराणी चौक येथे आल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

आंदोलनाची पूर्व कल्पना देऊनही पालकमंत्री पाटील कार्यालयात उपस्थित नसल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी पाटील यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचा शेतकरी घोषणाबाजी केली. 1 ते 10 जानेवारी दरम्यान बैठक घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

किसान सभेच्या मागण्या - 

  • सांगली, कोल्हापूर मार्गातील जमिनीचे अधिग्रहण झाल्याशिवाय राष्ट्रीय महामार्गासाठी अधिग्रहण करू नये.
  • अधिग्रहण केलेल्या जमिनीचा बाजारभावाच्या तुलनेत पाचपट मोबदला द्यावा.
  • देवस्थानच्या इनाम वर्ग 3 च्या जमिनी शेतकऱ्यांना द्याव्यात

सोमवार (ता.10) सांगली येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेल्या या पायी दिंडीत 100 हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. आज 52 किलोमीटरचे अंतर पार करून दुपारी एकच्या सुमारास दिंडी ताराराणी चौक येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर आली.

आंदोलनाची पूर्व कल्पना देऊनही पालकमंत्री पाटील कार्यालयात उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच राज्य व केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत ठिय्या मांडला.

वेगवेगळी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेले भाजप सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. मोठ मोठ्या प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर अधिग्रहित केल्या जात आहेत. देवस्थानच्या जमिनी खासगी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचा शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी शासनाने कायद्यात बदलही केले आहे.जर कसणार यांच्या जमिनी जबरदस्तीने काढून घेणार असाल तर शेतकरी तुमच्याकडून राज्य काढून घेतील.

-  उदय नारकर

सुभाष देशमुख म्हणाले,या आंदोलनाची माहिती दिली असतानाही पालकमंत्री कार्यालयात उपस्थित नाहीत. चंद्रकांत पाटील यांच्यासारखा उर्मट पालकमंत्री बघितला नाही. जोपर्यंत ते भेटीची वेळ लेखी देत नाहीत तोपर्यंत शेतकरी कार्यालयासमोरून हटणार नाहीत. 

किसान सभेच्या या आक्रमक भूमिकेनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वीय सहायकांनी किसान सभेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले. उदय नारकर व उमेश देशमुख यांनी त्यांच्याशी चर्चा करत बैठकीचे लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी 1 ते 10 जानेवारी दरम्यान बैठक घेण्याचे मान्य करून तसेच लेखी पत्र देण्याच्या सूचना केल्या. बैठकीचे लेखी पत्र मिळाल्यानंतर आजचे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पोलीस छावणीचे स्वरूप 

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताराराणी चौक परिसरातील कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यालयाचे गेट बंद करून त्या भोवती पोलिस व सीआरपीएफ जवानांनी गराडा घातला होता. सीसीटीव्ही सर्वेलन्स व्हॅन तैनात होती. आंदोलका पेक्षा पोलिसच जास्त असल्ल्यांने या आंदोलनाचा धसका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याची चर्चा आंदोलक शेतकऱ्यांमध्ये सुरू होती 

Web Title: Kisan Sabha agitation