कऱ्हाडात रंगली किशोर कुमार यांच्या गाण्याची मैफील

सचिन शिंदे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

किशोर कुमार फॅन क्लबतर्फे हौशी गीतकारांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. त्यात श्री. औंधकर यांनी गायलेले गीत विशेष प्रशसंनीय ठरले. 

कऱ्हाड : येथील पालिकेचे तत्कालीन व रहीमतपूरचे विद्यमान मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी 'आनेवाला कल जानेवाला है...' या किशोर दा यांच्या अदाकारीने बहारदार झालेले गीत गायले अन् अनेकांना त्यांच्या गायनाचा पैलू दिसून आला. येथील किशोर कुमार फॅन क्लबतर्फे हौशी गीतकारांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. त्यात श्री. औंधकर यांनी गायलेले गीत विशेष प्रशंसनीय ठरले. 

प्रशासनात अत्यंत कडक, वेळेत काम करणारे अन् कऱ्हाडला वेगवेगळ्या कारणाने वादाच्या चक्रव्यूव्हात अडकलेले श्री. औंधकर यांचे नेहमीच कऱ्हडाकरांना आकर्षण राहिले आहे. त्यांचे शालेय शिक्षणही येथेच पार पडले. त्यांचे कऱ्हाड आजोळ आहे. त्यांचे कासेगाव मुळगाव आहे. मात्र त्याची प्राथमिक जडणघडण कऱ्हाडला झाली. मुख्याधिकारी म्हणून ते प्रशासकीय सेवेत रूजू झाले. आळंदी येथे त्यांनी काम केले. तेथेही त्यांची छाप राहिली. त्यानंतर ते येथे मुख्याधिकारी म्हणून आले. मात्र सुरवातीपासून त्यांची कऱ्हाडची कारकिर्द ही वादाची ठरली. कितीही प्रयत्न केला तरी लोकप्रतिनिधी, कर्मचारी व त्यांच्यातील दरी कमी झाली नाही. परिणामी त्यांची जामखेड येथे बदली झाली. तेथे वर्षभराचा कालखंड पूर्ण झाला नाही की, त्यांची पुन्हा रहीमतपूर येथे बदली झाली आहे. सध्या ते तेथे कार्यरत आहेत. 

प्रशासकीय सेवेत काम करताना त्यांनी त्यांचे वेगवेगळे छंदही जोपासले आहेत. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, कासेगावला त्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू करणे हे काम ते करत आहेत. मात्र त्याबरोबर त्यांनी गायनाची जोपसलेली आवड कऱ्हाडकरांसाठी काल नाविन्याची ठरली. त्यांनी गायलेल्या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे एक प्रशासकीय अधिकारी असतानाही अनेक गुण असलेली व्यक्ती या निमित्ताने कऱ्हाडच्या व्यासपीठावर श्री. औंधकर यांची ओळख झाली. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Kishor Kumars song program in karhad