खाद्यतेल दर वाढीमुळे किचनचे बजेट कोलमडले

 Kitchen budget shrinks as food prices rise
Kitchen budget shrinks as food prices rise

वाळवा : खाद्यतेलाच्या दरात प्रती किलोमागे पंधरा ते वीस रुपयांची चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ही दुसरी दरवाढ आहे. प्रामुख्याने सरकी आणि पामतेलाच्या दरात वाढ झाली आहे. जे तेल बहुतेक घरातील गृहिणींना परवडणारे मानले जाते. तेलाच्या दरवाढीचा चटका थेट चुलीपर्यंत बसणार आहे. सध्या सरकी तेल 115, तर पामतेल 95 रुपये झाले आहे. हाच दर गेल्या महिन्यात 90 ते 95 आणि 75 रुपये होता. खाद्यतेलाच्या दराने सर्वच कुटुंबांचे गणित कोलमडणार आहे. 

शिवाय गोरगरीब शेतकरी कष्टकरी लोकांना याचा मोठा फटका बसणार आहे. प्रत्येक कुटुंबाला खाद्यतेल दररोजच्या जीवनात गरजेचे आहे. त्याशिवाय स्वयंपाकघरात पानच हलत नाही. दैनंदिन गरजेचा घटक म्हणून खाद्यतेलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सर्वसाधारण पाच माणसांच्या कुटुंबात आठवड्याला किमान दीड किलो तेलाची गरज लागते. बाजारात सध्या कांदा, बटाटा आणि लसणाचे दर कडाडले आहेत. त्या झळा सामान्य माणसाला असह्य होत असताना आत्ता खाद्यतेलाच्या दराने आभाळात झेप घेतली आहे. दररोजच्या आयुष्यात संघर्ष करावा लागणारा घटक देशात बहुसंख्य आहे. या घटकांसाठी सरकार काहीच सकारात्मक विचार करत नसल्याची भावना आत्ता वाढीस लागली आहे. यापूर्वी शेर पावशेर तेल आणून दररोजचा दिवस ढकलणाऱ्या घटकांसाठी ही दरवाढ आपत्ती ठरत आहे.

बाजारात सरकी आणि पामतेल वगळता इतर खाद्यतेलांचे दरही आधीच आवाक्‍याबाहेरचे आहेत. त्यामुळे सरकी आणि पामतेलाला पर्याय शोधणेही कोणाला शक्‍य नाही. दिवाळीत सरकी तेल 75 ते 78 रुपये प्रतीकिलो होते. केवळ चार महिन्यांत जवळपास दीडपटीने दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंचे सतत वाढते दर; आणि हाताला नसलेल्या कामामुळे कौटुंबिक पातळीवर कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरकारने जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी गोरगरीब करत आहेत. 

दर वाढवून जगण्यावरच निर्बंध

सरकार सगळ्या गोष्टींचे दर वाढवून जगण्यावरच निर्बंध आणत आहे की काय अशी शंका येण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

- मनीषा विजय मुळीक, गृहिणी वाळवा. 

व्यवसाय करणे मुश्‍कील

खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे व्यवसाय करणे मुश्‍कील झाले आहे. गोरगरीबच काय सगळ्या घटकांसाठी हे मोठे संकट आहे. 

- शामसुंदर पाटील, व्यापारी, इस्लामपूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com