केएमटी बस तिकीट दरवाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

कोल्हापूर - इंधन दरवाढीसह इतरही अनेक कारणांमुळे दररोज वाढत जाणारा तोटा कमी करण्यासाठी केएमटीने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीचा प्रस्ताव लवकरच प्राधिकरणाकडे पाठविला जाणार 
आहे. नव्या दरवाढीनुसार केएमटी प्रवासाचा पहिला टप्पा आठ रुपयांचा असणार आहे, तर पुढील टप्प्यांना २ ते ५ रुपये दरवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

केएमटीची अवस्था दयनीय आहे. दररोज सव्वा लाख रुपयांचा तोटा होत आहे. त्यातच बसेसच्या देखभालीचा प्रश्‍न असून चालकांची अुपरी संख्या, वडापचे आव्हान अशा अनेक संकटांनी घेरले आहे. केएमटीविषयी आस्था असणारे प्रशासन आणि अधिकारी यांची वानवा अलीकडच्या काळात जाणवू लागल्याने बुडत्याचा पाय खोलात अशीच अवस्था झाली आहे. त्यामुळे केएमटीला तारण्यासाठी आता दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

गेल्या तीन वर्षांत केएमटीने दरवाढ केलेली नाही. केएमटीला समांतर असणारी वडाप, एसटीची जनता गाडी याप्रमाणेच केएमटीचेही दर असावेत, या दृष्टीने दरवाढ केलेली नाही. आता मात्र दररोज तोटा सहन करत केएमटीची सेवा देणे हे गैरसोयीचे होत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासह विविध देणीही द्यायची असल्याने दरवाढ अनिवार्य झाली आहे. दरवाढीमुळे केएमटीचा तोटा काही अंशी कमी होणार आहे. या प्रस्तावावर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची स्वाक्षरी होताच हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला जाणार आहे.

असे आहेत दर
केएमटीच्या वतीने तिकीट दर निश्‍चित करण्यासाठी अकरा टप्पे तयार करण्यात आले आहेत. सध्या पहिल्या टप्प्यासाठी किमान तिकीट दर सात रुपये आहे. त्यानंतर दुसरा टप्पा आठ रुपये, तिसरा टप्पा १० रुपये, चौथा टप्पा ११ रुपये, पाचवा टप्पा १२ रुपये, सहावा टप्पा १४ रुपये, सातवा टप्पा १६ रुपये, आठवा टप्पा १८ रुपये, नववा टप्पा १९ रुपये, दहावा टप्पा २० रुपये, अकरावा टप्पा २१ रुपये असे दर असणार आहेत. नव्या प्रस्तावात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यासाठी कोणतीही तिकीट दरवाढ होणार नाही; परंतु त्यानंतरच्या टप्प्यांना दोन ते पाच रुपये तिकीट दरवाढ होणार आहे.

Web Title: KMT Bus ticket Increase