हलगर्जीपणामुळे कोकण किनारपट्टी असुरक्षित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

"व्याघ्र प्रकल्पात सुमारे 85 किलोमीटरची कोकण किनारपट्टी येते. त्या किनारपट्टीवर अद्ययावत कॅमेऱ्यांसह संरक्षण कुटी बसवण्यात येणार आहे. त्यासाठी भौगोलिक अभ्यास सुरू आहे. लवकरच त्या मार्गावर सुरक्षेचे ठोस उपाय हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठीही आम्ही पाठपुरावा करत आहोत.'' 

विनिता व्यास, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कऱ्हाड

कऱ्हाड  -  सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोकण किनारपट्टीवरून शिकारींसह पर्यटक बिनधास्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये प्रवेश करत असल्याचे एक मे रोजी सायंकाळी 12 ट्रेकर्सना अटक झाल्याने स्पष्ट झाले आहे. त्याचा अर्थ कोकण किनारपट्टी असुरक्षित आहे. त्यामागे वन्य जीव विभागाचा त्या भागात गस्त घालण्याचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, त्याशिवाय तेथे ठोस उपाय नसल्याचेही स्पष्ट आहे. 

सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. त्यात 85 किलोमीटरचा कोकणपट्टा येतो. तेथील सुरक्षेचा प्रश्न नेहमी ऐरणीवर असतो. या चोरट्या वाटांमार्गे अनेक लोक सहज व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येतात. त्यात काही शिकारींचाही समावेश आहे. अशा सुमारे 50 पेक्षाही जास्त लोकांना दोन वर्षांत अटक झाली आहे. त्या वाटांवर संरक्षण कुटी उभ्या कराव्यात, अशी पर्यावरण प्रेमींची मागणी आहे. ती किती योग्य आहे, हे काल वन्य जीव विभागाने 12 ट्रेकर्सना अटक केलेल्या घटनेवरून स्पष्ट होते. मागील काही दिवसांत सुमारे 43 संरक्षण कुटी बसवण्यात आल्या. मात्र, त्यात कोकण किनारपट्टीचा समावेश नव्हता. त्याला काही तांत्रिक गोष्टी कारणीभूत आहेत. त्याकडे दुर्लक्षून चालणार नाही. कोकण किनारपट्टीवर त्या संरक्षण कुटी बसवण्यासाठी त्याचा भौगोलिक अभ्यास करण्याचे काम सुरू आहे. त्या संरक्षण कुटी होतीलही; मात्र तोपर्यंत कोकण किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी येथे गस्त घालण्याचे नियोजन केले होते. त्यामध्ये नियोजनाचा अभाव असल्याने कोकण किनारपट्टी असुरक्षित आहे. ते वारंवार समोर येते आहे. गस्त घालण्यासाठी त्या मार्गावर बोटिंग, चालत पायलटिंग, पेट्रोलिंग अशा अनेक प्रकारे लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. मात्र, त्यात कर्मचारी हलगर्जीपणा करत आहेत. त्याचा परिपाक म्हणून कोअर झोनमध्ये लोकांच्या होणाऱ्या शिरकावाकडे पाहावे लागेल. 

कोकण किनारपट्टीचे असुरक्षित मार्ग
चिपळूणहून नंदिवशेमार्गे डिचोली येथे मुक्काम केला जातो 
नांदिवशेमार्गे गॉगत्याच्या खोऱ्यात उतरतात 
गॉगत्याच्या खोऱ्यातून शिरशिंगेकडे प्रवास केला जातो 
काही लोक कोकणातील खालून मार्गाने भैरवगडला येतात 
भैरवगडाकडून मळे कोळणेलाही जातात 
भैरवगडावरून बंदी असलेल्या प्रचितगडाला अनेकजण जातात 
कोयना भागातीलच जंगली जयगडला खालून कोकणातून लोक वर येतात 
जयगडाहून काही लोक डिचोली येथे जावून मुक्काम करतात 

"व्याघ्र प्रकल्पात सुमारे 85 किलोमीटरची कोकण किनारपट्टी येते. त्या किनारपट्टीवर अद्ययावत कॅमेऱ्यांसह संरक्षण कुटी बसवण्यात येणार आहे. त्यासाठी भौगोलिक अभ्यास सुरू आहे. लवकरच त्या मार्गावर सुरक्षेचे ठोस उपाय हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठीही आम्ही पाठपुरावा करत आहोत.'' 

विनिता व्यास, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कऱ्हाड

Web Title: kokan coastal line is unsafe sahyadree vyaghra project