गाडीला ‘कट’ मारल्याच्या प्रकारातून कोल्हापुरात एकाचा खून

 गाडीला ‘कट’ मारल्याच्या प्रकारातून कोल्हापुरात एकाचा खून

कोल्हापूर - आपटेनगर येथे शुक्रवारी (ता. ५) रात्री केरबा दगडू डोंगरे (वय ५५, रा. जुना वाशी नाका, आपटेनगर) यांचा अज्ञातांनी चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी करवीर पोलिसांनी दोन युवकांसह एका अल्पवयीन मुलाला सांगलीतून ताब्यात घेतले. नीलेश आनंदा आठवले (२१, रा. आपटेनगर), रोहित सुरेश दवडे (१८, रा. सानेगुरुजी वसाहत) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गाडीने कट मारल्याचा जाब विचारल्याच्या क्षुल्लक कारणातून मद्यधुंद संशयितांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. देशमुख यांनी या संदर्भात दिलेली माहिती अशी - डोंगरे, बागल चौक येथील एका कंपनीत कामाला होते. ते शुक्रवारी (ता. ५) रात्री दहाच्या सुमारास घरी जाण्यासाठी कंपनीतून बाहेर पडले. एका सहकाऱ्याने त्यांना आपटेनगर येथील जुन्या नाक्‍यावर सोडले. तेथून ते चालत जात होते. ते चिव्याचा बाजार येथील कच्च्या रस्त्यावर आले. तेथे मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञातांनी अचानक त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला होता. परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा गुन्ह्याचा तपास करीत होत्या.

करवीरचे उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या सूचनेनुसार करवीर पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून प्राथमिक माहिती घेतली. त्याचवेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका मोटरसायकलवरून तीन संशयित भरधाव जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या मोटरसायकल क्रमांकाचा शोध घेतला. या वेळी संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली. 

आठवले, दवडेसह त्याच्या अन्य एका साथीदाराने कृत्य केल्याचे समोर येताच पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मुंबई, पुणे, सांगली याठिकाणी पथके रवाना केली होती. या दरम्यान, आज तिघे सांगली येथे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार करवीर पोलिस ठाण्याच्या पथकाने आठवले व दवडेला अटक केली; तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मोटारसायकलवरून जात असताना कट मारल्याचा जाब डोंगरे यांनी विचारला. यातून वादावादी झाली. या वेळी चाकूने त्यांच्या छातीवर तीक्ष्ण वार केल्याची कबुली संशयितांनी दिली. हल्ला केला त्या वेळी तिघेही संशयित मद्यधुंद अवस्थेत असल्याचे व हल्ल्यानंतर ते मुंबई व परिसरातील नातेवाइकांकडे गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार करवीर पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकातील सहायक निरीक्षक धनंजय पिंगळे, संभाजी काळे, उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, हेडकॉन्स्टेबल रवी पाटील, प्रशांत माने, राजेंद्र जरळी, सुहास पाटील, सागर कांडगावे, सुमीत पाटील, गुरुप्रसाद झांबरे, दीपक घोरपडे, प्रथमेश पाटील, धर्मेंद्र बगाडे आदींनी कारवाई केली.

चाकूचा वापर कशासाठी?
अटक केलेले आठवले व दवडे रेकॉर्डवरचे गुन्हेगार नाहीत. मध्यमवर्गीय कुटुंबातील या संशयितांनी रामपुरी चाकू आपल्या मोटारसायकलमध्ये ठेवला होता. त्याचे नेमके कारण काय, ते परिसरात लुटमारीचे प्रकार करीत होते का याबाबत तपास करणार असल्याचे अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com