कोल्हापूर : विधानसभेसाठी भाजपला हव्यात दहा पैकी पाच जागा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

‘भाजपची जिल्ह्यातील वाढलेली ताकद पाहूनच विधानसभा मतदारसंघाचे वाटप झाले पाहिजे. लोकसभेला भाजप-शिवसेनेची युती झाली. विधानसभा निवडणुकीतही ती होईल. अशा वेळी जिल्ह्यामध्ये पक्षाचा जो विस्तार झाला आहे तो लक्षात घेऊन ५० टक्केचा नियम ठेवून दहा पैकी पाच विधानसभेच्या जागा भाजपला मिळणे आवश्‍यक आहे.

कोल्हापूर - लोकसभेला असलेली भाजप, शिवसेनेची युती विधानसभेलाही असेल. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारक्षेत्रात भाजपचे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे विधानसभेला जिल्ह्यातील दहापैकी पाच जागा भाजपला हव्यात, अशी मागणी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केली. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

जाधव म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत ज्या योजना राबवल्या, त्यामुळे मध्यमवर्गीय, सामान्य लोकांचे जीवन सुखकर झाले. त्यामुळे मोदी यांची लाट याही निवडणुकीमध्ये होती. केंद्रात मोदी पंतप्रधान पाहिजेत म्हणून शिवसेनेला मत देणाऱ्यांची संख्याही खूप आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेला मोठा लाभार्थीवर्गही तयार झाला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कल्पकतेमुळे जिल्ह्यात अनेक सामाजिक कामे सुरू झाली. रुग्णसेवेचेही मोठे काम सुरू आहे. वेगवेगळे महोत्सव, स्पर्धा यामुळे पक्षाचे कार्य घराघरामध्ये पोचले आहे. यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या मनात भाजपविषयी विश्‍वास निर्माण झाला असून पक्षाचा विस्तार जिल्ह्यात सर्वत्र झाला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात जाळे तयार केले आहे. प्रत्येक घराघरांत, गावात भाजपचे कार्यकर्ते, पक्षाची शाखा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाची बूथ रचना पूर्ण असून याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वांना आला आहे. केंद्र आणि राज्य याप्रमाणेच जिल्ह्याच्या राजकारणातही भाजपचे स्थान अव्वलच आहे.’

विधानसभा निवडणुकीबाबत जाधव म्हणाले, ‘भाजपची जिल्ह्यातील वाढलेली ताकद पाहूनच विधानसभा मतदारसंघाचे वाटप झाले पाहिजे. लोकसभेला भाजप-शिवसेनेची युती झाली. विधानसभा निवडणुकीतही ती होईल. अशा वेळी जिल्ह्यामध्ये पक्षाचा जो विस्तार झाला आहे तो लक्षात घेऊन ५० टक्केचा नियम ठेवून दहा पैकी पाच विधानसभेच्या जागा भाजपला मिळणे आवश्‍यक आहे. पक्षातील कार्यकर्त्यांची ही इच्छा असून लवकरच याबाबत पक्ष नेतृत्वाशी बोलणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी समसमान जागा मिळणे गरजेचे आहे. कोणत्या जागा भाजपला लढवायच्या आणि कोणत्या शिवसेनेला द्यायच्या, याबाबत त्यावेळी चर्चा केली जाईल. या वेळी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, विजय जाधव उपस्थित होते.

ते आले तर स्वागत
लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार सतेज पाटील यांची प्रा. संजय मंडलिक यांना रसद मिळाली. भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार श्री. पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत काय, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ‘‘पक्षात कोणीही आले तरी त्यांचे स्वागतच आहे. भाजपमध्ये राज्यातील दिग्गज मंडळी येत आहे. त्यामुळे ते आले तर स्वागतच असेल व काँग्रेसमुक्त जिल्हा करण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होईल.’’

Web Title: In Kolhapur BJP wants five seats in the Assembly election