हॅपी दिवाळी पाडवा, हॅपी शॉपिंग...!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

दिवाळीसाठी नवीन कपड्यांची खरेदी झाली असली तरी आता पुढे लग्नसराई सुरू होणार आहे. त्यासाठी गारमेंट क्षेत्रानेही असंख्य व्हरायटी उपलब्ध केली आहे. जगभरातील नामांकित गारमेंट ब्रॅंडही आता कोल्हापुरात उपलब्ध झाले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी शोरूम्स कोल्हापुरात उभी राहिली असून, किड्‌स वेअरपासून इंटरनॅशनल सूटिंग-शर्टिंग, साड्यांच्या व्हरायटीही येथे उपलब्ध झाल्या आहेत.

कोल्हापूर - दिवाळी पाडव्याच्या खरेदी उत्सवासाठी बाजारपेठ सज्ज असून उद्या (ता. 31) खरेदीची धूम राहणार आहे. "एक रुपयात एलईडी, 99 रुपयांत रेफ्रिजरेटर' अशा आकर्षक जाहिरातींमुळे ग्राहक मोठ्या संख्येने बाजारपेठेकडे आकर्षित झाला असून, खरेदीवर वित्तीय सहाय्य योजनांचीही यंदा क्रेझ आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर गुंजभर का होईना सोने खरेदीची परंपराही जपली जाणार असून, ज्वेलरी क्षेत्रात यंदाही तेजोमय दिवाळी असेच चित्र अनुभवायला मिळणार आहे.

सराफ कट्टा सज्ज
सण आणि परंपरा म्हणून सोने खरेदीबरोबरच इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याचा पर्यायही स्वीकारला जाऊ लागला आहे. भविष्याचा विचार करून "वळ्या'च्या स्वरूपात सोने खरेदीबरोबरच "गोल्ड कॉईन' आणि बुलियन स्वरूपातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाणार आहे. पारंपरिक दागिन्यांसह 21 व्या शतकातील तरुणींसाठी लेटेस्ट फॅशनच्या बिंदीपासून जोडव्यांपर्यंतचे अनेक प्रकारचे मन मोहून टाकणारे सुंदर दागिने शोरूम्समध्ये उपलब्ध आहेत. सर्वांनाच सोनं, हिरे यांचे दागिने परवडत नाहीत, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही प्रेशस स्टोन्स, मोती यांपासून बनवलेल्या दागिन्यांना मागणी अधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर चांदीवर सोन्याचे पाणी चढवलेल्या टॉप्स, बांगड्या, सेट्‌स अगदी माफक किमतीत उपलब्ध आहेत. विविध रत्नांनाही मोठी मागणी राहणार आहे.

एक रुपयात एलईडी
"एक रुपया घेऊन या, एलईडी घेऊन जा', "99 रुपयांत रेफ्रिजरेटर' अशा आकर्षक जाहिराती आणि ऑफर्सच्या धमाक्‍यासह इलेक्‍ट्रॉनिक्‍सची शोरूम सज्ज झाली असून, मोबाइल खरेदीवरही आकर्षक ऑफर्स जाहीर झाल्या आहेत. एक्‍स्चेंज ऑफरही अनेक शोरूमनी दिल्या असून, खरेदीवर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही येथे ग्राहकांना मिळणार आहे.
स्मार्ट फोनवरही आकर्षक ऑफर्स असून हप्त्यामध्ये खरेदीची सुविधा उपलब्ध आहे.

ऑटो मार्केट सज्ज
कोल्हापुरात दरवर्षी दुचाकी आणि चारचाकी अशा सुमारे एक लाख वाहनांची विक्री होते. त्यामुळे येथील ऑटो मार्केटही हाउसफुल्ल आहे. काही वाहनांसाठी तर एक वर्षाचे वेटिंग आहे. वाहन खरेदीसाठी आकर्षक वित्तीय योजनाही जाहीर झाल्या असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सायकलींच्या शोरूममध्येही लाख-दीड लाखापर्यंतच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध असून, येथेही खरेदीवर आकर्षक योजना आहेत.

निवासी व कमर्शियल प्रकल्प
मुंबई, पुण्यानंतर आता कोल्हापूरला अधिक पसंती मिळत असून, उद्योगधंद्यांसह विविध व्यवसायासाठी येथे मोठी पसंती मिळत आहे. "एज्युकेशन हब' म्हणून अनेक नवी स्थित्यंतरे येथे घडत असून, या साऱ्या पार्श्‍वभूमीवर रिअल इस्टेट क्षेत्राला महत्त्व आले आहे. सामान्यांना परवडतील अशा माफक शुल्कांत त्यांच्या स्वप्नातील घरं कशी देता येतील, याचा जगभरातील विविध कार्यशाळांना हजेरी लावून येथील बांधकाम व्यावसायिकांनी अभ्यास केला आहे. त्यामुळे या क्षेत्रात आता नवीन संकल्पना राबवल्या जात असून, शंभरहून अधिक गृहप्रकल्प साकारले जात आहेत.

ब्युटी अन्‌ टुरिझमही
विविध प्रकारची खरेदी तर आहेच, शिवाय सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या ब्युटी अँड वेलनेस सेवाही विविध ऑफर्ससह सज्ज झाल्या आहेत. दिवाळी सुटीचा आनंद लुटण्यासाठी "टूर्स अँड ट्रॅव्हल्स' कंपन्यांनीही ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत.
 

Web Title: Kolhapur celebrates Diwali