चौकी फोडण्यापर्यंत गेली मजल

चौकी फोडण्यापर्यंत गेली मजल

कोल्हापूर - आमच्याकडे बघून शिवी दिली, बैलगाडी पुढे घेण्यास नकार दिला, अशा कारणातून शहर परिसरात हाणामाऱ्या, तोडफोड, चाकू हल्ल्याचे प्रकार रोज घडत आहेत. हे केवळ निमित्त असते. चौकाचौकात थांबणारी टोळकी, त्याच्यात सुरू असणारा वर्चस्ववादाचा संघर्ष हे त्यामागचे खरे कारण असते. यांच्यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही. त्यातूनच थेट पोलिस चौकीची तोडफोड करणारे ‘दादा’ निर्माण होऊ लागलेत. 
शहरातील चौकाचौकांत टोळक्‍यांचा वावर वाढला आहे.

पॉश कपडे, डोक्‍यावर अगर शर्टात अडकवलेला गॉगल, गळ्यात सोन्याची गोफ, हतात सोन्याची साखळी परिधान करून वाहन घेऊन तरुण भागाचा ‘दादा’ आहोत अशा आविर्भावात उभा असतो. 

दाखल गुन्हे

  • खुनाचा प्रयत्न - ७३
  • गर्दी मारामारी - ११३

त्याच्या भोवतीने आठ ते दहा तरुण घुटमळताना दृष्टीस पडतात. भागात वर्चस्व निर्माण करण्यावरूनच त्यांच्यात संघर्ष निर्माण होतात. यातूनच हाणामाऱ्या, तोडफोडीसह चाकू, तलवार हल्ले होतात. अशा प्रकारांना शहरात गेल्या काही दिवसापासून ऊत आला आहे. 

महिन्यात यादवनगरात दोन गटांत हाणामारी झाली. त्याच दिवशी वाहनांचा लाईट डोळ्यावर पाडल्याच्या रागातून चाकू हल्ला झाला. दौलतनगर येथे आठ दिवसांपूर्वी दोन गटात राडा झाला. यात वाहनांची तोडफोड केली. पोलिस मोटारीवर दगड फेकण्याचा प्रयत्न झाला. घरांचीही तोडफोड करून महिलेसह तरुणांना मारहाण केली. प्रतिभानगर येथील रेड्याच्या टकरीजवळ किरकोळ कारणावरून चाकू हल्ला केला.

उत्तरेश्‍वरपेठेत त्र्यंबोली यात्रेनंतर दोन गट आमने-सामने आले. इतकेच नव्हे तर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दोन तरुणांत मारामारी झाली. त्यात एका तरुणाने येथील वाहतूक पोलिस चौकीची तोडफोड करण्यापर्यंतचे धाडस दाखवले. 

नव्या ‘एसपीं’नी लक्ष द्यावे
गल्लोगल्ली तयार होणाऱ्या ‘दादा’कडून भागात दबदबा निर्माण केला जात आहे. सामान्य नागरिक याबाबत आवाज उठवू शकत नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अशा दादाची दहशत घातक ठरू शकते. नूतन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी याबाबत लक्ष घालून अशा दादा लोकांच्या वेळीच मुसक्‍या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com