कोल्हापुरात मोटार खाणीत कोसळली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

कोल्हापूर - भरधाव वेगाने जाणारी मोटार रंकाळ्यामागील मोहिते खाणीत बुडाली. या दुर्घटनेत बाप-लेकीचा मृत्यू झाला. राहुल बजरंग जाधव (वय 36, रा. गांधीनगर, आष्टा ता. वाळवा, जि. सांगली) आणि शर्वरी राहुल जाधव (3) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही कोल्हापुरातील नातेवाइकांकडे आले होते. अग्निशमन दल, पोलिस आणि व्हाईट आर्मीच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविली. गाडीवरचा ताबा सुटल्याने ती खाणीत कोसळल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

इराणी खाणीला लागून असलेली मोहिते खाण सुमारे चाळीस फूट खोल आहे. रस्त्यापासून पंधरा फूट अंतरावर असलेल्या खाणीत गाडी थेट खाली कोसळली. तेथून जाणाऱ्या नागरिकांनी अंगावर काटा उभा करणारा हा भीषण अपघात पाहिला. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला याची कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य पाहून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रेस्क्‍यू व्हॅन, 108 क्रमांकाची रुग्णवाहिकाही जागेवर पोचली. व्हॉटस्‌ ऍपवरून मेसेज फिरू लागले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी होऊ लागली. खाणीच्या बाजूने लोक उभे राहिले. सुरवातीला अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरखंड टाकण्याचा प्रयत्न केला. दोरखंड अपुरा होता. त्यामुळे क्रेन बोलाविण्यात आली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ती दाखल झाली. झाडाला दोरखंड बांधून मोटार उचलण्याचा प्रयत्न सुरू झाला. योगेश जाधव आणि तानाजी कवाळे यांनी पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. थोड्या वेळाने व्हाईट आर्मीचे जवान दाखल झाले. बोटीच्या साहाय्याने मोटारीचा शोध सुरू झाला.

क्रेनचा दोरखंड खोलवर गेल्यानंतर मोटारीचा अंदाज येऊ लागला. साडेसहाच्या सुमारास मोटार वर काढण्यात यश आले. मोटारीची काच फोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. वाहन चालविण्याच्या परवान्यावरून जाधव यांची ओळख पटली. मोटारीत नेमके किती जण होते याचा काहीच अंदाज येत नव्हता. भरीस भर म्हणून गाडीला बांधलेला दोरखंड दोन वेळा तुटला. साडेसातच्या सुमारास पुन्हा तिसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला.

Web Title: Kolhapur collapsed car in mine