‘थेट पाईपलाईन’वरून महासभेत एकच गदारोळ

‘थेट पाईपलाईन’वरून महासभेत एकच गदारोळ

कोल्हापूर - थेट पाईपलाईनच्या कामाची श्‍वेतपत्रिका न काढल्यावरून महापालिका सभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी याच प्रश्‍नी आक्रमक होऊन सभात्याग केला. महापौरांच्या निषेधाचे पडसाद सभागृहात उमटले. सभाध्यक्षा महापौर सरिता मोरे यांनी सभा तहकूब केली.

घरफाळा, पाणीपट्टी वाढीसारखे विषय पटलावर होते. सभेची वेळ अकराची; ती नेहमीप्रमाणे एक वाजला तरी सुरू होईना. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडी सदस्य सुरवातीपासूनच संतापले होते. रूपाराणी निकम यांनी आम्ही काय टाईमपासला येथे येतो का, सभागृहाची चेष्टा चालवली आहे का, असा सवाल केला.

महापौरांनी श्‍वेतपत्रिका काढण्याचे आदेश देऊनही प्रशासन त्यांचे ऐकत नाही, असा आरोप सुनील कदम यांनी केला. 
सभागृहात काळ्या फिती लावलेल्या विरोधी आघाडीच्या सदस्यांनी प्रश्‍नोत्तरांचा तास सुरू होण्यापूर्वीच थेट पाईपलाईनच्या श्‍वेतपत्रिकेवरून प्रशासनाला धारेवर धरले. महापौर सातत्याने खाली बसून घ्या, असे सांगत होत्या; मात्र सदस्य काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. महापौरांनी आदेश देऊनही श्‍वेतपत्रिका का निघत नाही, असा सवाल त्यांनी केला. याप्रश्‍नी कारवाई झाल्याशिवाय सभेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

आयुक्तांकडून दिलगिरी
थेट पाईपलाईनच्या कामाची श्‍वेतपत्रिका काढण्याचा शब्द देऊनही तो न पाळल्याबद्दल आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रशासनाच्या वतीने सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. येत्या शुक्रवारपर्यंत श्‍वेतपत्रिका काढण्याचे आश्‍वासन प्रभारी जल अभियंत्यांनी दिले.

परिवहन सभापती निवड सोमवारी
परिवहन समिती सभापती निवडीसाठी सोमवारी, १८ फेब्रुवारीला सभा होत आहे. स्थायी समिती सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता सभेस सुरवात होईल. सभापती राहुल चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले आहे. शुक्रवारी (ता. १५) उमेदवारी अर्ज भरले जातील.

योजनेचा वाढीव खर्च महापालिकेला भरावा लागत आहे. योजनेची बिले बोगस आहेत. सांगितलेले काम होत नाही. २०१९ नव्हे, तर २०३० उजाडले तरी योजनेचे काम होणार नाही. सध्या हे काम बंद आहे. पैसे खाण्यासाठी योजना आणली गेली, असा गंभीर आरोप सदस्यांनी केला.

किरण नकाते, सत्यजित कदम, राजसिंह शेळके, अजित ठाणेकर, विलास वास्कर, विजय सूर्यवंशी असे सर्वच सदस्य संतप्त झाले. प्रशासनाचा निषेध करत सदस्यांनी सभात्याग केला. घरफाळ्यासारखा महत्त्वाचा विषय पुरवणी विषयपत्रिकेवर लावल्याने त्यांनी महापालिका चौकात महापौरांचा निषेध केला. तेथे जोरदार घोषणा देऊन शंखध्वनी केला.

महापौरांच्या निषेधाची बातमी कानावर पडताच सभागृहातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्यही संतप्त झाले. भाजप शिवसेना सत्तेत असताना थेट पाईपलाईनच्या उर्वरित कामाची परवानगी देणे अपेक्षित होते; मात्र जाणीवपूर्वक दिली जात नसल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी केला. शारंगधर देशमुख यांनी घरफाळा आणि पाणीपट्टीच्या प्रस्तावावर चर्चा होईल, असे स्पष्ट केले.

विरोधी आघाडीला विश्‍वासात न घेता चर्चा झाली, असा संदेश जाऊ नये, यासाठी दोन्ही विषयांवर पुढील सभेत निर्णय घेण्याचे ठरले. पाईपलाईनच्या प्रश्‍नी गदारोळ झाला असताना आयुक्त गप्प का, असा सवाल नियाज खान यांनी केला. तौफिक मुल्लाणी यांनी प्रभारी जल अभियंत्यांवर कारवाईची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com