मंदिरे, दर्ग्यांसह आठवठा बाजारातही प्रचाराचा धुरळा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता उडाला असून मंदिरे, दर्ग्यांबरोबरच आठवडा बाजारातही मतदारांपर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज तैनात झाली आहे. प्रचाराला आता केवळ चारच दिवस मिळणार असल्याने रणरणत्या उन्हातही प्रचार फेऱ्यांवर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी भर दिला आहे. दरम्यान, अटीतटीच्या लढतीत आता गट आणि गणातील मोठ्या बुडक्‍यांना आणि पै-पाहुण्यांच्या गोतावळ्याला महत्त्व आले असून त्यादृष्टीने जोडण्या सुरू झाल्या आहेत. अर्थात या जोडण्यांत शेवटच्या क्षणापर्यंत कुणाला काय हवं आणि नको, याचीही खबरदारी घेतली जाणार आहे. 

"डीपी' बदलले 
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत अधिक ऑनलाइन असणारी अकाउंट निवडणुकीनंतर बराच काळ बंद झाली होती. फेसबुकवरची विविध पेजीस असोत किंवा व्हॉटस्‌ ऍप ग्रुप असोत; आता नव्याने सक्रिय झाले आहेत. निवडणुकीतला सोशल मीडियाचा वापर लक्षात घेता काही इच्छुक उमेदवारांनी गेल्या सहा महिन्यांपासूनच सोशल मीडियावर हजेरी लावली आहे. शक्‍य तितके मित्र आणि शक्‍य तितके ग्रुप जॉइन करून त्यांनी आपला सोशल मीडियावरचा "बेस' पक्का केला आहे. कारण निवडणुकीत तीन "एम' फॅक्‍टर महत्त्वाचे ठरणार आहेत. पहिला एम फॅक्‍टर असेल मनी पॉवरचा, दुसरा एम फॅक्‍टर असेल मॅन पॉवरचा आणि तिसरा एम फॅक्‍टर सोशल मीडियाचा ठरणार आहे. साहजिकच व्हॉटस्‌ ऍपवरच्या डीपीवरही आता उमेदवारांचे चेहरे झळकू लागले आहेत. 

परगावचे मतदान 
प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या आवाजात झडत असल्या तरी वैयक्तिक संपर्कासाठी प्रचार फेऱ्या आणि कोपरा सभांनी आता जिल्हा दुमदुमून जाणार आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने परगावी असलेल्या मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून हे मतदानही निर्णायक ठरणार आहे. विशेषतः शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, चंदगड, आजरा या जिल्ह्यातील लोक नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने मुंबईत आहेत. त्यांना आणण्यासाठीची यंत्रणा आता कामाला लागली आहे. 

जेवणावळी वाढल्या 
कालच्या अंगारकी संकष्टीनंतर आता शेवटच्या चार दिवसात जेवणावळी वाढणार असून आचारसंहिता भरारी पथकाच्या नजरेतून सुटण्यासाठी या चार दिवसात ज्या कार्यकर्त्यांचे वाढदिवस आहेत. त्यांचीही लिस्ट तयार झाली आहे. त्या-त्या तारखेला कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या नावाखाली जेवणाच्या पंगती उठणार आहेत. प्रत्येक गोष्टीचे अतिशय सूक्ष्म नियोजन करण्यावर उमेदवारांनी भर दिला असून विश्‍वासू कार्यकर्त्यांवर विभागनिहाय जबाबदाऱ्या दिल्या आहेत. दिलेल्या तेवढ्याच जबाबदाऱ्या प्रत्येकाने चोख पार पाडाव्यात, असे स्पष्ट आदेशही देण्यात आले आहेत. 

बंडखोरांवर नजर 
पक्षाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले, मात्र नेत्यांचे आदेश आल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली. नेत्यांच्या आदेशानुसार सध्या ते पक्षाच्या उमेदवाराबरोबर प्रचारात सक्रिय असले तरी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्याचे अपडेटस्‌ दररोज सकाळी आणि रात्री न चुकता घेतले जात आहेत. 

Web Title: Kolhapur - District Panchayat Samiti election campaigning