कोल्हापूर इंजिनियर्स असोसिएशनचे उद्योगश्री पुरस्कार जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

  • कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगश्री पुरस्कारासाठी तीन उद्योजकांची निवड
  • सुधाकर ऊर्फ भाऊसाहेब कुलकर्णी यांची यशवंत कंपनी इंजिनियर्स, दुधाणे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, जे. पी. इंजिनियर्स यांना पुरस्कार जाहीर
  • स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांना "जीवनगौरव पुरस्कार' जाहीर.

कोल्हापूर - कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगश्री पुरस्कारासाठी तीन उद्योजकांची निवड करण्यात आली आहे. सुधाकर ऊर्फ भाऊसाहेब कुलकर्णी यांची यशवंत कंपनी इंजिनियर्स, दुधाणे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, जे. पी. इंजिनियर्स यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांना "जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला.

येत्या रविवारी (ता. 29) उद्योगपती माधवराव बुधले सभागृहात सकाळी दहाला या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. भारत फोर्ज कंपनीचे कार्यकारी संचालक बसवराज कल्याणी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. असोसिएशनचे मानद अध्यक्ष अतुल आरवाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने दिलेली माहिती अशी, की कोल्हापुरातील औद्योगिक चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. त्याला उज्ज्वल इतिहास आहे. येथील उद्योजकांनी बनविलेल्या उत्पादनांना जागतिकस्तरावर लौकिक मिळाला. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार येथील उद्योजकांना मिळाले आहेत. अशा उद्योजकांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच नव्या पिढीतील उद्योजकांना प्रेरणा मिळावी, यासाठी औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना, उद्योजकांना "उद्योगश्री पुरस्कार' देण्यात येतो.

उद्योजक भाऊसाहेब कुलकर्णी यांचे यशवंत कंपनी इंजिनियर्सच्या माध्यमातून कास्टींग मशिन शॉपमध्ये उल्लेखनीय काम आहे; तर ज्ञानदेव दुधाणे यांच्या डी. एस. दुधाणे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने ऑईल इंजिन उत्पादनात आघाडी घेतली. इंदुमती जोशिलकर यांच्या जे. पी. इंजिनियर्समध्ये शीट मेटल, लिंक चेन या प्रकारचे उत्पादन होते. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना उद्योगश्री पुरस्कार जाहीर केले आहेत. 

शिवाजीराव देसाई यांना "जीवनगौरव पुरस्कार' 
औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबरोबर अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया घालण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांना "जीवनगौरव पुरस्कार' देण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर बसवराज कल्याणी यांचे "भारत फोर्ज म्यॅन्युफॅक्‍चरिंग एक्‍सलंन्स' या विषयावर व्याख्यान होईल. सोहळ्यास सर्व उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योजक सचिन मेनन, कमलाकांत कुलकर्णी, अमर कारंडे, संजय अंगडी, प्रसन्न तेरदाळकर आदींनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Engineers association Industry Award Announced