#KolhapurFloods एटीएम मशिनमधील पावणेदोन कोटी पुरात भिजले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - कोल्हापूर शहर, शिरोळ, कुरुंदवाड, करवीर तालुक्‍यातील सुमारे शंभरहून अधिक एटीएम मशिन पाण्याखाली गेल्यामुळे सुमारे पावणेदोन कोटी रुपयांच्या नोटा पाण्यात भिजून खराब झाल्या आहेत. राष्ट्रीयीकृत, खासगी, नागरीसह इतर बॅंकांच्याही रकमेचा यामध्ये समावेश आहे.

कोल्हापूर - कोल्हापूर शहर, शिरोळ, कुरुंदवाड, करवीर तालुक्‍यातील सुमारे शंभरहून अधिक एटीएम मशिन पाण्याखाली गेल्यामुळे सुमारे पावणेदोन कोटी रुपयांच्या नोटा पाण्यात भिजून खराब झाल्या आहेत. राष्ट्रीयीकृत, खासगी, नागरीसह इतर बॅंकांच्याही रकमेचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बॅंकेच्या कुरूंदवाड येथील एटीएममध्ये असणारे आठ लाख रुपये पूर येण्यापूर्वीच काढून घेतले होते. मात्र एटीएम मशीनचे नुकसान झाले आहे. मात्र, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा नोटांचा तुटवडा नाही. लोकांना आवश्‍यक तेवढी रक्कम एटीएममध्ये उपलब्ध आहे.  

करवीर तालुक्‍यात आंबेवाडी तसेच प्रयाग चिखली येथील राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या एटीएम मशीनमधील २५ लाख रुपये पाण्यात भिजले आहेत. तर एका नामवंत राष्ट्रीयकृत बॅंकांची १ कोटी रुपयांची रक्कम पाण्यात भिजली आहे. याशिवाय, पूरबाधित क्षेत्रातील सुमारे १०० हून अधिक एटीएम मशीन पाण्याखाली गेल्यामुळे कोट्यावधी रुपये पाण्यात भिजल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही मशिन वॉटरप्रूफ आहेत. तरीही, जोपर्यंत पाणी ओसरत नाही किंवा त्या एटीएम मशीनची प्रत्यक्ष पाहणी केली जात नाही. तोपर्यंत  यातील निश्‍चित आकडा समजणार आहे. दरम्यान, याबाबत उद्या जिल्हाधिकारी दौलत देसाई जिल्ह्यात एटीएमची सद्यस्थिती आणि नोटांची उपलब्धतेचा आढावा घेणार आहेत. 

आज एटीएम सुरू होतील
जिल्ह्यात ६४७ एटीएम मशीन आहेत. यापैकी ३१३ एटीएममध्ये २५ कोटी रुपये आहेत. काही ठिकाणी नेटवर्क नाही. वीज नसल्याने अशा ठिकाणची एटीएम मशीन बंद आहेत. पन्नास टक्के एटीएम सुरू आहेत. दरम्यान, काल ( रविवार) पेक्षा आज जास्त एटीएम मशीन सुरू झाली आहेत. पुर ओसरल्यामुळे आज (मंगळवार )जास्ती जास्त एटीएममशीन सुरू होतील.  

वाॅटर लाॅकिंग सिस्टिम असल्याने रक्कम सुरक्षित ?

आंबेवाडीत २५ लाख पाण्यात आहेत. एका राष्ट्रीयकृत बॅंकेचे १ कोटी पाण्यात आहेत. मात्र याला वॉटर लॉकिंग सिस्टिम आहे. त्यामुळे ही रक्कम सुरक्षित राहिल असा अंदाज केला जात आहे. प्रत्यक्ष हे एटीम पाहिल्यानंतरच कळणार आहे. 
...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Flodds rupees in ATM machine completely soaked